जारावंडीच्या टॉवरची रेंज वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:41 AM2021-08-21T04:41:41+5:302021-08-21T04:41:41+5:30
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. मोबाईलची गरज लक्षात घेऊन या भागातील अनेक नागरिकांनी मोबाईलची खरेदी ...
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. मोबाईलची गरज लक्षात घेऊन या भागातील अनेक नागरिकांनी मोबाईलची खरेदी केली आहे. जारावंडी परिसरातील जवळपास १० ते १२ किमी अंतरावरील गावकऱ्यांनीही मोबाईल खरेदी केले आहेत. मात्र, त्या गावांमध्ये कव्हरेज राहत नाही. बीएसएनएलचे सर्वाधिक ग्राहक ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेंज वाढविल्यास ग्राहकांना सेवा मिळण्याबरोबरच बीएसएनएलला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होईल. त्यामुळे येथील बीएसएनएल टॉवरची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माेबाईल सेवा नसल्याने प्रशासकीय कामेेसुद्धा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लाडज गावाचा विकास रखडला
देसाईगंज : अखंड चंद्रपूर जिल्हा असताना पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज या गावाचे १९६१-६२ या साली तेव्हाच्या आरमोरी तालुक्यात व आताच्या देसाईगंज तालुक्यात आमगाव ग्रामपंचायतीमध्ये जुनी लाडज येथील ३९५ कुटुंबांना ९९९ हेक्टर जागेवर नवी लाडज येथे पुनर्वसित करण्यात आले. मात्र, मागील ६० वर्षांनंतर या पुनर्वसित गावांसाठी शासनाकडून येणाऱ्या विविध सोयी-सवलती व योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील प्रवासी निवारा जीर्ण
देसाईगंज : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीतून विसाेरा येथील वडसा, कुरखेडा या राज्यमार्ग ३१४ च्या कडेला प्रवाशांच्या साेयीसाठी प्रवासी निवारा बांधण्यात आला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या निवाऱ्याचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. पाेस्टर चिकटविल्याने देखणे रूप खराब झाले आहे. परिणामी प्रवासी निवाऱ्याचे बाहेर उन्हातान्हात उभे राहून विश्रांती घेणे पसंत करतात. प्रशासनाने सदर प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी. रंगरंगाेटी करून याला नवे रूप द्यावे, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडून हाेत आहे. देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक निवाऱ्यांची छत वादळाने उडून गेले आहे. भिंती तुटफूट झाल्या आहेत.