अंगारा येथील टॉवरची रेंज वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:34 AM2021-02-07T04:34:30+5:302021-02-07T04:34:30+5:30
कलापूर मोकाट जनावरांचा हैदोस कमलापूर : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास ...
कलापूर मोकाट जनावरांचा हैदोस कमलापूर : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे.
वन जमिनीवर अतिक्रमण; जंगल धोक्यात
देसाईगंज : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे. वन विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काेरची तालुक्यातील रस्त्यांची रुंदी वाढवा
काेरची : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जाते वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येते.
कोटगूल येथे आयटीआयची मागणी
कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोटगूल परिसरात चार माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. गडचिरोली येथे आयटीआय आहे. येथील बहुतांश युवक छत्तीसगड राज्यात राेजगारासाठी जातात.
रस्त्यांवर बांधकाम साहित्याचा पसारा
गडचिराेली : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. नगर परिषदेच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून तो भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो.
झुडुपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडुपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.
लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सेविका कमी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करते. मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दर हजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने या भागातील दळणवळणाची व्यवस्था मजबूत करण्यासाठी नव्याने पुलाची उभारणी करावी, अशी मागणी आहे.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. फवारणीची मागणी करूनही प्रशासनाच्या वतीने फवारणी करण्यात आली नाही. डासांमुळे विविध प्रकारचे आजार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
लाहेरी: विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्या, अशी मागणी आहे. अनेक शेतकरी आता साैरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण करीत आहेत.