आॅटोरिक्षा परवाना नूतनीकरणास १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
By admin | Published: November 1, 2015 01:50 AM2015-11-01T01:50:23+5:302015-11-01T01:50:23+5:30
ज्या आॅटोरिक्षांचे परवाने रद्द, व्यपगत झाले आहेत, असे परवाने १६ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे.
पत्रकार परिषद : सतीश सहस्त्रबुद्धे यांची माहिती
गडचिरोली : ज्या आॅटोरिक्षांचे परवाने रद्द, व्यपगत झाले आहेत, असे परवाने १६ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा आॅटोरिक्षा चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाचे अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
परवाने नूतनीकरणाबाबत ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅक्टोबर रोजी आढावा बैठक पार पडली असता, बऱ्याच आॅटोरिक्षा परवानाधारकांनी नुतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने १६ आॅक्टोबरपर्यंत आॅटोरिक्षाचा परवाना नूतनीकरणास मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत परवाने नूतनीकरण न केल्यास ते कायमचे रद्द केल्या जातील. परिवहन विभागाच्या वतीने राज्यभर ३० आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. पत्रकार परिषदेला चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहेर, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे, आरटीओ निरीक्षक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)