विस्तार अधिकाऱ्यांची ग्रा. पं.ला संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:31+5:302021-04-29T04:28:31+5:30
गडचिरोली जिल्ह्यामध्ये काेराेनाचे बरेच रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे कोरची येथील काेविड केअर केंद्र पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याठिकाणी ...
गडचिरोली जिल्ह्यामध्ये काेराेनाचे बरेच रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे कोरची येथील काेविड केअर केंद्र पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याठिकाणी कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यास जागा कमी पडत आहे. तसेच कोरची तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण जास्त असून, त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे गावात फिरताना दिसून येतात, त्यामुळे इतर व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह होत आहेत. यास प्रतिबंध करणे आणि गावातील प्राथमिक शाळा, खासगी विद्यालय, आश्रमशाळा व मंडळ कार्यालयाची साफसफाई करण्यात यावी तसेच पिण्याच्या पाण्याची व विजेची व्यवस्था करून त्याठिकाणी होम आयसोलेशनमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात यावे तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरूनच करण्यात यावी, त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्ण गावात कोणीही भेटणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
गृह विलगीकरणात असलेल्या गंभीर रुग्णाची माहिती आशा वर्करकडून घेतल्यानंतर त्या गंभीर रुग्णाची तालुक्यातील कोविड केअर सेंटर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएससी) मध्ये भरती करण्याची जबाबदारी त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची राहणार असून, या सूचनांचे पालन न केल्यास व त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित त्या त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी हे प्रशासकीय कारवाईस पात्र राहणार आहेत.
यासाठी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिवार्द यांच्या आदेशानुसार कोरची पंचायत समिती गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी आदेशपत्र काढून कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीला संपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकाऱ्यांसह १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
बाॅक्स ..
अर्लट राहावे लागणार
संपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या २९ ग्रामपंचायतींना दररोज भेटी देऊन त्यांची फोटो (नोट कॅम्प) मध्ये व उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे (आरटीपीसीआर) व अँटिजेन टेस्ट करण्यासाठी लोकांना उपस्थित ठेवणे याबाबत नियोजन करणे तसेच स्वतः उपस्थित राहणे आहे व नोट कॅम्पचे फोटो दररोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वरिष्ठ सहायक पुसदकर यांच्या व्हाॅट्सॲप नंबरवर पाठविणे आहे. या कामांमध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.