अतिवृष्टीच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:39+5:30
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. गडचिरोली-धानोरा दरम्यानच्या अनेक नाल्यांवर पाणी असल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प होती. केवळ गडचिरोली-चंद्रपूर हा मार्ग दिवसभर सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गुरूवारी रात्री व शुक्रवारी दिवसा जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरांची पडझड झाली. गडचिरोली-चंद्रपूर मार्ग वगळता सर्वच मुख्य मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली होती. हजारो हेक्टर शेतात नदी, नाल्यांच्या पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. शनिवारी सुध्दा अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने सखल भागात व नदी जवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात मागील २४ तासात ६६.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली डेपोतून जिल्हाभरात बसगाड्या सोडल्या जातात. मात्र धानोरा, चामोर्शी या तिन्ही मार्गावरील नदीवरून पाणी असल्याने सकाळपासूनच बसफेऱ्या बंद होत्या. नागपूर मार्गावरची वाहतूक दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती. मात्र १२ वाजतानंतर गाढवी व पाल नदीवरील पुलावर पाणी चढल्याने आरमोरी मार्गावरची वाहतूक ठप्प पडली. गडचिरोली-मूल मार्गावरची वाहतूक मात्र दिवसभर सुरू होती.
तुळशी : तुळशी येथील गावालगतचा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावातील पाणी रस्त्यावरून वाहण्यास सुरूवात झाली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. तुळशी- कोकडी मार्गावर झाड कोसळला. त्यामुळे काही काळ रहदारी ठप्प पडली होती. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील धानपीक व इतर पिके धोक्यात आली आहेत. हिरालाल सिताराम मेश्राम, रेवनाथ मारबते, अनिल मेश्राम, सखाराम बन्सोड, तुकाराम बन्सोड, देवचंद दोनाडकर, दिनकर सुकारे, रामदास वझाडे, श्रावण वझाडे यांच्या घरांचे नुकसान झाले.
सिरोंचा : सिरोंचात शुक्रवारी मध्यरात्रीपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस कोसळत होता. मुसळधार पावसामुळे गर्कापेठा येथील नागेश कुमरी यांचे घर कोसळले.
आलापल्ली : आलापल्लीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या सिरोंचा मार्गावरील मोसम ते नांदगाव या दोन गावांच्या मध्ये असलेल्या नाल्याच्या पुलावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद होती. कमलापूर ते छल्लेवाडा मार्गावरील एक लहान पूल वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. छल्लेवाडा गावाजवळच एक नाला आहे. या नाल्याच्या काठावर भिमारगुडा, तेलगुगुडा, कमरपल्ली ही गावे वसली आहेत. नाल्याला पूर आल्याने नागरिकांच्या घरांमध्ये रात्री पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची बरीच धावपळ झाली.
रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी गावाजवळ असलेला तलाव ओव्हर फ्लो झाला. ओव्हर फ्लोचे पाणी गावातून वाहत होते. अनेकांच्या दुकानांमध्ये तसेच नामदेव पेंदाम, शशिकांत साळवे यांच्या सह इतर नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. रांगी गावातील संदीप हलामी, रामचंद्र खेवले, विनोद नागापुरे, नामदेव पेंदाम यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.
भामरागड : भामरागडजवळील पर्लकोटा नदीला पूर आल्याने तसेच पुलावरून पाणी चढल्याने भामरागडसह तालुक्यातील गावांचा गुरूवारपासून संपर्क तुटला आहे. कमलापूर परिसरातील नाल्यांना पूर आल्याने जवळपास सर्वच मार्ग बंद आहेत. कोळसेलगुडम, छल्लेवाडा, राजाराम, दामरंचा गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाड कोसळल्याने रहदारी ठप्प झाली आहे.
धानोरा : धानोरा-गडचिरोली मार्गावरील राजोली गावाजवळच्या राजी नाल्याला पूर आल्याने सदर मार्ग शुक्रवारी सकाळपासूनच बंद होता. या नाल्यावरून चार फूट पाणी वाहत होते. एका ट्रक चालकाने पाण्यातून ट्रक टाकला. मात्र मध्येच ट्रक बंद पडल्याने सदर ट्रक मध्येच अडकून पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडला आहे.
गुड्डीगुडम : परिसरातील तिमरम व गुड्डीगुडम परिसरातील शेकडो हेक्टर शेतामध्ये पाणी शिरले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. निमलगुडम येथील चार घरांमध्ये पाणी शिरले. आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव व झिमेला या दोन गावांच्या मध्ये असलेल्या नाल्याचे पाणी रस्त्यावर चढल्याने शुक्रवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत हा मार्ग बंद होता. १ वाजतानंतर हा मार्ग मोकळ झाला. या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य गंगाराम आत्राम, इलियास शेख, सुरेश भुजाडे यांनी केली आहे.
अंकिसा : अंकिसा परिसरातही अतिवृष्टी झाल्याने अनेक नाल्यांना पूर आला. त्यामुळे रहदारी ठप्प झाली होती. सोमनपल्ली येथील नाला तुडूंब भरल्याने वाहतूक ठप्प पडली होती.
कुरखेडा : कढोली येथील सती नदी पुलावरून पाच फूट पाणी चढल्याने या पुलावरून सकाळी ८ वाजेपासूनच वाहतूक बंद पडली होती. ट्रकांची मोठी रांग लागली होती. कुरखेडा-वैरागड हा मार्ग सुध्दा बंद होता.
कोरेगाव/चोप : कोरेगाव/चोप परिसरातील शंकरपूर जवळील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरूनही वाहतूक ठप्प पडली होती.
विसोरा : शंकरपूर गावातील होमराज चंदनबटवे, लक्ष्मण चंदनबटवे, पुरूषोत्तम चंदनबटवे, विलास मेश्राम, अमित मेश्राम, नामदेव मेश्राम, धनुरधर टेंभुर्णे, विनोद टेंभुर्णे, नरहरी टेंभुर्णे, हरीदास जांभुळकर, चिंतामन शिंदे, प्रकाश बुल्ले, रज्जाक शेख यांच्या घरात पाणी शिरले. विसोरा येथील प्रभू करांकर, तुलाराम नेवारे, गिरीधर गुरनुले, विलास ठेंगरी, जगण गजभे, शंकरपूर येथील पुरूषोत्तम चंदनबाटवे, प्रकाश धोंडणे, आनंदराव भोयर, रामचंद्र सौंदरकर, परसराम बगमारे, नरेश हरडे, हरीदास जांभुळकर यांची घरे कोसळली. विसोरा-शंकरपूर, विसोरा-पोटगाव, विसोरा-एकलपूर, विसोरा-देसाईगंज मार्गावरील झाडे कोसळल्याने सदर मार्ग बंद होते. मागील महिनाभरात गाढवी नदीला तिसऱ्यांदा पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान झाले.
मोहटोला/किन्हाळा : कोकडी येथील गजानन सहारे, श्रावण शेंडे तसेच देसाईगंज येथील मानवता प्राथमिक शाळेची भिंत कोसळली.
वैरागड : मानापूर येथील गोविंदा जयराम चट्टे यांचे घर कोसळले. कढोली, मानापूर, करपडा, सुकाळा, कोसबी, वैरागड, आरमोरी हे सर्व मार्ग बंद होते. वैरागड येथे पाणी शिरल्याने नुकसान झाले.
देसाईगंज : तालुक्यातील विहिरगाव येथील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे दैनंदिन साहित्याचे नुकसान झाले. देसाईगंज तालुक्यात सुमारे २१५ मिमी पाऊस पडला.
चामोर्शी : तालुक्यातील गजानन धोंडू धोटे यांचे घर अतिवृष्टीन कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील साहित्याचे नुकसान झाले.
शनिवारी सुध्दा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न नागरिकांनी करू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
हे मार्ग होते बंद
गडचिरोली-आरमोरी मार्गावरील पाल व गाढवी नदीवर पाणी चढल्याने सदर मार्ग बंद होता. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. गडचिरोली-धानोरा दरम्यानच्या अनेक नाल्यांवर पाणी असल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प होती. केवळ गडचिरोली-चंद्रपूर हा मार्ग दिवसभर सुरू होता. गडचिरोली एसटी डेपोच्या एकूण ९८ शेड्युल्डपैकी जवळपास ३० शेड्युल्ड रद्द करण्यात आले.
कुरखेडा-रांगी, अहेरी-देवलमरी, आलापल्ली-भामरागड, कमलापूर-रेपनपल्ली, आरमोरी-देसाईगंज, शंकरपूर-बोडधा, फरी-किन्हाळा, एटापल्ली-आलापल्ली, अहेरी-सिरोंचा, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानापूर-पिसेवडधा, हलदी-डोंगरगाव, कोरची-घोटेकसा, धानोरा-मालेवाडा, चोप-कोरेगाव यासह अनेक मार्गावरची वाहतूक ठप्प पडली होती.
जुन्या अरततोंडीतील १५० नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविले
देसाईगंज तालुक्यातील जुनी अरततोंडी हे गाव गाढवी नदीच्या अगदी काठावर वसले आहे. १९९५ मध्ये या गावाचे पुनर्वसन किन्हाळा गावाच्या शेजारी करण्यात आले. ५० टक्के नागरिकांनी गाव सोडले. मात्र ५० टक्के नागरिक अजुनही जुन्याच गावात आहेत. शुक्रवारी गाढवी नदीचे पाणी गावात शिरायला सुरूवात झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर एसडीएम विशाल मेश्राम, तहसीलदार के. टी. सोनवाने, ठाणेदार प्रदीप लांडे यांनी रेस्क्यू पथकासह अरततोंडी गाव गाठले. गावातील जवळपास १५० नागरिकांना दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढले. मात्र जवळपास पुन्हा १५० नागरिकांनी गाव सोडण्यास नकार दिला. उंच भागावर आम्ही थांबणार असून या ठिकाणी कधीच पूर येत नाही, असे सांगितले. त्यामुळे सदर नागरिक गावातच थांबून होते. आमदारांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील जवळपास २५ शेतकरी त्यांच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र दुपारी अचानक नाला व खोब्रागडी नदीच्या पुराच्या पाण्याने त्यांच्या शेतांना वेढा घातला. सदर माहिती आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिगांबर सूर्यवंशी यांना प्राप्त झाली. त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून रेस्क्यू बोट बोलविली. या बोटच्या मदतीने सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आरमोरी तालुक्यातीलच चामोर्शी नाल्याजवळ १६ व्यक्ती अडकले होते. रेस्क्यू टीमने त्यांना बाहेर काढले. घरी पोहोचल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.