जहाल नक्षलवादी महिलेचे आत्मसमर्पण; ठेवण्यात आले होते सहा लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:14 PM2021-06-23T21:14:14+5:302021-06-23T21:16:41+5:30
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०१९-२०२१ या वर्षामध्ये एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
गडचिरोली - हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आणि शासनाच्या आत्मसर्पण योजनेमुळे प्रभावित होऊन सहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका जहाल नक्षलवादी महिलेने २३ जूनला गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले. येथील नवजीवन वसाहतीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तिचे स्वागत केले. (an extremist naxalite Woman surrenders in Gadchiroli)
शशिकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजू आसाराम आचला (३०) रा. मोठा झेलिया, ता. धानोरा, असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी महिलेचे नाव आहे. शशिकला ही डिसेंबर २००६मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. सध्या ती टिपागड एलओएसमध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर नक्षल चकमकीचे १५, जाळपोळीचा एक आणि इतर चार, असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिला पकडून देणाऱ्यास शासनाने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
महिला नक्षलीचे गडचिरोलीत आत्मसमर्पण; दोन लाखांचे बक्षीस केले होते जाहीर
आत्मसमर्पण योजनेमुळे अनेक नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आदी उपस्थित होते.
दोन वर्षांत ३९ नक्षलींची शरणागती -
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०१९-२०२१ या वर्षामध्ये एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये चार डीव्हीसी, दोन दलम कमांडर, तीन उपकमांडर, २९ सदस्य आणि एक जनमिलिशिया आदींचा समावेश आहे. आता या आत्मसमर्पण केलेल्यांना आश्रय देण्यासाठी पोलिसांनी गडचिरोली शहरालगत खास वसाहत तयार केल्यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.