रूग्णालय सीसीटीव्हीच्या नजरेत
By admin | Published: April 21, 2017 01:07 AM2017-04-21T01:07:45+5:302017-04-21T01:07:45+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयातील वॉर्ड, मुख्य दरवाजे, वॉर्डाचे दरवाजे, कॅरिडॉर, ओपीडी विभाग या ठिकाणी सुमारे ३८ सीसीटीव्ही ...
३८ कॅमेरे लागले : रूग्णालयातील प्रत्येक हालचालीवर शल्य चिकित्सकांचे लक्ष
गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील वॉर्ड, मुख्य दरवाजे, वॉर्डाचे दरवाजे, कॅरिडॉर, ओपीडी विभाग या ठिकाणी सुमारे ३८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याने संपूर्ण रूग्णालय सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहे. त्यामुळे या ठिकाणी घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर थेट नजर राहण्यास मदत होणार आहे.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात सुमारे २०० खाटांची व्यवस्था आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट रूग्ण दरदिवशी भरती होऊन उपचार घेतात. त्यामुळे या रूग्णालयात नेहमीच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ राहते. तालुकास्थळावरील रूग्णालयांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथेच दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढते.
अलिकडेच लहान मुले पळवून नेणे, डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होणे यासारखे प्रकार वाढत चालले आहेत. या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रूग्णालय प्रशासनाने सुमारे ३८ सीसीटीव्ही कॅमेरे रूग्णालय परिसरात लावले आहेत. या कॅमेरांचे मॉनिटरींग जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कॅबिनमध्ये ठेवण्यात आले आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या खोलीमध्ये सुध्दा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असल्याने या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामुळे जिल्हा रूग्णालयात घडणाऱ्या प्रत्येक बाबीवर तसेच असामाजिक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सकांची नजर राहण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)