मिरकल व चकीनगट्टात सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 05:00 AM2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:58+5:30
अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मिरकल व चकीनगट्टा गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. हे दोन्ही गावे नक्षलग्रस्त असल्याने या गावांचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे. घनदाट जंगलातून पायवाटेने नागरिकांना आवागमन करावे लागते. भरपूर दाट जंगल असल्याने हिंस्त्र पशुंपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही गावाच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.
जंगलव्याप्त परिसर असल्याने अनेक भागात वीज पुरवठा नेहमी खंडित होतो. अनेकदा दोन ते तीन दिवस पूर्ववत होत नाही. मिरकल येथे जिल्हा परिषद शाळा आहे. परंतु येथे मोजकेच विद्यार्थी असल्याने शिक्षकही नियमित येत नाही. आरोग्य, शिक्षण व अन्य सोयीसुविधांसाठी नागरिकांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीदरम्यान राजकीय नेते गावकऱ्यांना विकासकामांचे आश्वासन देतात परंतु निवडणुकीनंतर आश्वासन पाळत नाही. रूग्णांना रूग्णालयात नेण्याकरिता अहेरी-भामरागड या मुख्य मार्गावर यावे लागते. त्यानंतर येथून बस किंवा खासगी वाहनांच्या सहाय्याने रूग्णालय गाठून उपचार घ्यावा लागतो. या भागात भ्रमणध्वनी कव्हरेजचाही अभाव असल्याने नागरिक समस्याग्रस्त जीवन जगत असल्याचे नागरिकांनी सांगितले.