बनावट बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:32 AM2021-04-05T04:32:55+5:302021-04-05T04:32:55+5:30
अहेरी : तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेली महा ई सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ...
अहेरी : तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेली महा ई सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा ई सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
बनावट बिलाचा वापर
गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार बनावट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी.
ग्रामीण भागात रॉकेल मिळण्यास अडचण
आलापल्ली : जिल्ह्यात अवैधरित्या रॉकेलची सर्रास विक्री होत असली तरी ग्रामीण भागात अनेक नागरिकांना राॅकेल मिळत नसल्याचे दिसून येेते. अनेक रॉकेल दुकानदार गैरमार्गाने रॉकेल विकत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी.
अगरबत्ती निर्मिती मजुरी वाढवा
गडचिरोली : वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पांमध्ये शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र, अगरबत्ती बनविण्याचा दर अत्यंत कमी असल्याने मजुरांना कमी मजुरी मिळत आहे. त्यामुळे मजूर त्रस्त आहेत.
बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा
आलापल्ली : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिला जात आहे. परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी हाेत आहे.
काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात
मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्र्कं डा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भूमी अभिलेखची पदे रिक्त
एटापल्ली : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंजूर १७ पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहेत. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.
पूल निर्मितीची मागणी
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्याप पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
अल्पवयीन बनले चालक
गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस चौकी सुरू करा
गडचिरोली : गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहात नाही. अनेकदा ही पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते. बसस्थानकातील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवावी.
रुग्णवाहिकेची गरज
कमलापूर : कमलापूर हे गाव अतिसंवेदनशील, दुर्गम भागात असून, या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. येथे ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रेपनपल्ली, गुंडेरा, जिमलगट्टा यासह परिसरातील नागरिक येतात.
दोन बसेसची मागणी
अहेरी : शेकडो नागरिक दरदिवशी तेलंगणा राज्यात जातात. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तेलंगणासाठी दोन बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. कमलापूर परिसरात उमानूर, राजाराम, मरपल्ली, खांदला, रेपनपल्ली, तिमरम, गोविंदगाव, इंदाराम, रेगुलवाही या ग्रामपंचायती येतात.
अहेरीत वाहतूक कोंडी
अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हाेत आहे.