अक्षरज्ञान नसलेल्या देवेंद्रची स्वयंरोजगारात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 01:39 AM2017-05-20T01:39:08+5:302017-05-20T01:39:08+5:30
कुटुंबातील अठराविश्व दारिद्र्यामुळे शिक्षण घेऊ न शकल्याने निरक्षर असलेल्या बोरी येथील देवेंद्र वातुजी भादे या युवकाने....
नागपूर येथे घेतले प्रशिक्षण : आरमोरी तालुक्यातील बोरी येथे व्यवसाय; बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : कुटुंबातील अठराविश्व दारिद्र्यामुळे शिक्षण घेऊ न शकल्याने निरक्षर असलेल्या बोरी येथील देवेंद्र वातुजी भादे या युवकाने कुकुटपालन व्यवसायात नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्याचे हे यश जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
देवेंद यांच्याकडे फक्त एक एकर शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी अनेक वर्ष कठोर मेहनत घेऊन जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवर्षी तोट्याचाच सामना करावा लागत होता. परिणामी कुटुंबाचा प्रपंचही भागविणे कठीण होत होते. त्यामुळे काहीतरी नवीन शिकण्याच्या उद्देशाने त्यांनी नागपूर गाठले. नागपूर येथील डॉ.कदम यांच्या मार्गदर्शनात दुधलवार यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये चार वर्ष काम केले. या माध्यमातून तिथे रोजगारही मिळाला. त्याचबरोबर या व्यवसायातील माहितीही घेतली. लहान पिले खरेदी करणे, त्यांचे संगोपन करणे, त्यांना लागणारे खाद्य, त्यांच्यावर होणारे आजार आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. कोंबड्यांचे प्रकार, त्यांची घ्यावयाची काळजी याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहीत नसेल एवढी माहिती देवेंद्रकडे आहे. कुटुंबातील दारिद्र्यामुळे त्याने शाळेत जाऊन शिक्षण घेतले नाही. त्यामुळे त्याला अक्षरज्ञान नाही. मात्र व्यवहारिक ज्ञानाची जाण पूर्ण आहे. त्याने हैद्राबादी जातीचे दोन हजार कोंबडीचे पिले खरेदी करून व्यवसायाला सुरुवात केली आहे. गावासभोवतालच्या किरकोळ व्यापाऱ्यांना माल विकण्यास सुरुवात केली. याून त्याच्या व्यवसायाने चांगली उभारी घेतली आहे.
निरक्षर असूनही व्यवसायात त्याने जम बसविला आहे. ‘पैसा नाही त्यामुळे उद्योग करू शकत नाही’ असा दिंडोरा पिटणाऱ्या युवकांसाठी देवेंद्रचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे. कोंबड्यांच्या पिलांची विशेष काळजी घेत असल्याने उन्हाळ्यातही त्याच्याकडील सर्वच पिलांचे आरोग्य सुदृढ आहे. त्यामुळे जलदगतीने वाढ होण्यास मदत होते व वजनही चांगले राहते. याचा फायदा देवेंद्रला होत आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.