कुटुंबं गाढ झोपेत अन् तीन घरांना आगीचा वेढा; सुदैवाने जीवितहानी टळली, संसार उघड्यावर
By संजय तिपाले | Published: March 3, 2024 02:28 PM2024-03-03T14:28:44+5:302024-03-03T14:28:55+5:30
पहाटे साखरझोपेत असतानाच तीन घरांना आगीने कवेत घेतले. शेजाऱ्यांनी आरडाओरड करुन कुटुंबांना जागे केले अन् ते सुखरुप बाहेर आली, त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली.
गडचिरोली: पहाटे साखरझोपेत असतानाच तीन घरांना आगीने कवेत घेतले. शेजाऱ्यांनी आरडाओरड करुन कुटुंबांना जागे केले अन् ते सुखरुप बाहेर आली, त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली, पण या घटनेेने कुटुंबे उघड्यावर आली. ही घटना ३ मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील देवलमारीत घडली. आगीमागील कारण अस्पष्ट आहे.
अहेरीपासून १२ किलोमीटर अंतरावरील देवलमारी येथील मुत्तय्या मंचर्ला हे शेखर व संतोष या दोन मुलांसह राहतात. तिघांचीही स्वतंत्र घरे आहेत. २ मार्चला रात्री जेवण करुन सर्वजण आपापल्या घरी झोपी गेेले. पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरांना आग लागली. आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी तिघांनाही जागे केले. त्यानंतर ते कुटुंबासह घराबाहेर पडले. या आगीत धान्य, कपडे, भांडी व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की ती आटोक्यात आणण्याची संधीही मंचर्ला कुटुंबीयांना मिळाली नाही.
अश्रू अनावर
दरम्यान, अहेरी नगरपंचायतीचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला, पण तोपर्यंत संपूर्ण घरे जळून खाक झाली होती. या घटनेने तिघाही पिता - पुत्रांचा संसार उघड्यावर आला असून नुकसान पाहून कुटुंबांना अश्रू अनावर झाले होते. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.