गडचिरोलीतील गाव पाटलाचे नऊ जणांचे कुटूंब रात्रीतून रहस्यमरित्या गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:32 PM2018-03-03T16:32:58+5:302018-03-03T16:33:07+5:30
धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या भटमरयान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांची मुले, सुना व नातवंडे असे संपूर्ण कुटुंबातील नऊ जण एका रात्रीतून बेपत्ता झाले आहेत.
नक्षल्यांची धमकी की पोलिसांचा जाच? गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्काला उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या भटमरयान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांची मुले, सुना व नातवंडे असे संपूर्ण कुटुंबातील नऊ जण एका रात्रीतून बेपत्ता झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून ते कुठे गेले आहेत आणि कोणत्या अवस्थेत आहेत याची कोणालाच माहिती नसल्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
शंकर आचला यांची गावात जवळपास ५० एकर शेती आहे. त्यांचा मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासह मानापूर (दे) येथे राहतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्र मांकाचा मुलगा आणि सुनांसह ते भटमरयान येथे राहतात. ५ दिवसांपूर्वी ते आपली दोन्ही विवाहित मुले, दोन सुना, तीन नातवंड आणि पत्नी यांच्यासह घराला कुलूप लावून रात्री गायब झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे पाळीव प्राणीही घराच्या आवारात बेवारस अवस्थेत आहेत. ते असे अचानक कुठे गेले, कशामुळे गेले याबाबत कोणालाच माहिती नाही. गावातील त्यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आचला यांच्याकडे आधी नक्षल्यांचे जाणे-येणे असायचे. त्यातून ८ दिवसांपूर्वीच पोलीस त्यांच्याकडे चौकशीसाठी आले होते. नक्षल्यांबद्दल आम्हाला माहिती द्या, नाहीतर तुमच्या कुटुंबाला नक्षल समर्थक म्हणून अटक करू असा दम पोलिसांनी भरला होता, अशी चर्चा गावात आहे. मात्र यासंदर्भात पोलिसांना विचारले असता आचला हे नक्षल्यांच्या भितीने कुठेतरी गेले असल्याचे ते म्हणाले.
आचला कुटुंबियांना पोलिसांनी नाही तर नक्षल्यांनी धमकावले आहे. त्या भितीतून ते सुरक्षित स्थळी कुठेतरी गेले आहेत. ते नेमके कुठे आहेत याची आम्हालाही माहिती नाही. खरे म्हणजे गावकऱ्यांनीच आचला यांच्याबद्दल नक्षल्यांचे कान भरले आहेत. त्यामुळे त्या कुटुंबियांवर ही वेळ आली आहे.
- रणजित पाटील
उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा