लग्नाहून घरी परतताना अंगावर वीज कोसळली; दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चाैघांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 07:10 PM2023-04-24T19:10:48+5:302023-04-24T19:10:56+5:30
गावकऱ्यांचे हृदय हेलावले, पाऊस आला म्हणून झाडाच्या बुंद्याखाली थांबले, पण...
पुरुषोत्तम भागडकर/ देसाईगंज: झाडाखाली बसलेल्या कुटुंबावर वीज पडून दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरवाडीतील लग्नसमारंभ आटोपून चौघे परतत होते, यावेळी अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. सोबत दोन चिमुकल्या असल्याने दुचाकी उभी करुन चौघे झाडाखाली थांबले.
यावेळी अचानक झाडावर वीज कोसळली आणि यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. हृदय हेलावणारी ही घटना तालुक्यातील कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील तुळशीफाटा येथे आज(दि 24) सायंकाळी पावणे सहा वाजता घडली. बाली भारत राजगडे(२), देवाशी भारत राजगडे (४), अंकिता भारत राजगडे (२९) व भारत राजगडे (३५, सर्व रा. आमगाव बुट्टी ता.देसाईगंज) या चौघांचा घटनेत मृत्यू झाला.
भारत राजगडे यांची गळगला (ता.कुरखेडा) ही सासरवाडी आहे. सासरवाडीत नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी तीन दिवसांपासून भारत राजगडे हे पत्नी व दोन मुलींसह गेले होते. २४ एप्रिलला लग्न समारंभ आटोपल्यावर ते दुचाकीवरुन कुटुंबासह परत गावी जाण्यास निघाले. कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील तुळशीफाटा येथे अचानक पाऊस सुरु झाला.
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ लागल्याने रस्त्यालगत दुचाकी उभी करुन ते झाडाच्या बुंद्याला थांबले. एवढ्यात वीज झाडावर कोसळली. यात चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण कुटुंब उध्दवस्थ झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आमगाव बुट्टी गावावर शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.