भरधाव टॅक्सीची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 12:50 AM2017-01-14T00:50:26+5:302017-01-14T00:50:26+5:30
कुरखेडावरून प्रवासी घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने ...
काका-पुतण्या गंभीर : कुरखेडा येथील वन विभागाच्या नाक्यानजीकची घटना
कुरखेडा : कुरखेडावरून प्रवासी घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील काका-पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना कुरखेडा येथील वन विभागाच्या नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. विनोद नानाजी खुणे (२८) व तुकाराम मन्साराम खुणे (४२) अशी गंभीर जखमी आहेत.
तालुक्यातील आंधळी येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य विनोद नानाजी खुणे हे त्यांचे काका तुकाराम मन्साराम खुणे यांना घेऊन आपल्या एमएच-३३-जे-९१५४ क्रमांकाच्या दुचाकीने रामगडवरून कुरखेडाकडे येत होते. दरम्यान कुरखेडावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या एमएच-३३-ए-३८ क्रमांकाच्या टॅक्सीने वन विभागाच्या नाक्याजवळ दुचाकीला जबर धडक दिली. सदर टॅक्सीने दुचाकीला तब्बल ३० फूट फरफटत नेले. दुचाकीवरील काका-पुतण्या या दोघांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी लागलीच कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडताच टॅक्सी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतली. या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)