दुसऱ्याच्या शेतातून मोटार बंद करायला गेला अन् जीव गमावला; करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 07:49 PM2022-09-21T19:49:18+5:302022-09-21T19:50:18+5:30
मधुकर दौलत सेलोकर (६५) रा. पळसगाव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आरमोरी/जोगीसाखरा (गडचिरोली) - आपल्या कृषीपंपाची बटन बंद करण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून नेहमीप्रमाणे गेलेल्या शेतकऱ्याला विद्युत प्रवाहाचा झटका बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथे उघडकीस आली.
मधुकर दौलत सेलोकर (६५) रा. पळसगाव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मधुकर सेलोकर यांनी नदीकाठावरून आपल्या शेतात पाणीपुरवठा लाईन कार्यान्वीत केली होती. तेथे मोटार पंपचे कनेक्शन होते. सदर कनेक्शन बंद करण्यासाठी ते नेहमी फाल्गुन बघमारे यांच्या शेतातून जात असत. परंतु वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बगमारे यांनी आपल्या शेतात विद्युत प्रवाह एका ताराद्वारे सोडला होता. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मधुकर सेलोकर हे मोटारपंपचे कनेक्शन बंद करण्यासाठी बगमारे यांच्या शेतातून जात असतानाच त्यांचा स्पर्श जिवंत विद्युत ताराला झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळ होऊनही ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ते बगमारे यांच्या शेतात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.
कोणावर गुन्हा दाखल होईल?
वन्यप्राण्यांकडून होणारी पिकांची हानी टाळण्यासाठी तसेच संरक्षणासाठी विद्युतचा अवैधरित्या वापर केल्याप्रकरणी वन विभाग चौकशी करीत आहे. या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल होईल, याबाबत चर्चा असली तरी देसाईगंज पोलिसांनी फाल्गुन बगमारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.