शेतकरी गटांनी अवजारे बँकेचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:10 AM2021-02-28T05:10:59+5:302021-02-28T05:10:59+5:30
कोरची - मानव विकास योजनेंतर्गत अवजारे बँक स्थापनेकरिता अनुसूचित जाती ...
कोरची - मानव विकास योजनेंतर्गत अवजारे बँक स्थापनेकरिता अनुसूचित जाती - जमातीच्या शेतकरी गटांना लाभ देण्याची योजना प्रस्तावित आहे. कुरखेडा व कोरची तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे यांनी केले आहे.
सन २०२०-२१करिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी गटांना कृषी यंत्र बँक स्थापन करून विकास आणि प्रसार करणे हा प्रकल्प शासन मान्यतेसाठी प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकरिता कुरखेडा व कोरची तालुक्यांची निवड करण्यात आली असून, दोन्ही तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी विहीत नमुन्यात संपर्क कागदपत्रासह १० मार्च २०२१ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत.
यावेळी प्राप्त होणाऱ्या अर्जांची उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीसमोर छाननी करून अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त नोंदणीकृत शेतकरी गटांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे यांनी केले आहे.
या अवजारे बँक योजनेत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, नांगर, चिखलणी यंत्र, पेरणी यंत्र व केजव्हील यांचा समावेश असून, या योजनेत ९० टक्के अनुदान असून, १० टक्के लोकवाटा आहे, याची नोंद शेतकरी गटांनी घ्यावी, असे म्हटले आहे.