वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; सलग व्याघ्रबळींनी आरमोरी तालुका हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 02:44 PM2022-06-29T14:44:46+5:302022-06-29T14:51:59+5:30
शेतापासून अगदी २० मीटर अंतरावर असलेल्या जंगलात वाघरे हे खाकऱ्या तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेतली.
आरमोरी (गडचिरोली) : तालुक्यातील बोरी चक येथे शेतीला लागून असलेल्या जंगलात खाकऱ्या तोडत असलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालून ठार केले. ही घटना बुधवारी (दि. २९) सकाळी साडेसात दरम्यान कक्ष क्रमांक ५२ मध्ये घडली. सागर आबाजी वाघरे (४५, रा. बोरी चक) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यातील बोरी चक येथील सागर आबाजी वाघरे हे सकाळी काही मजूर आणि शेतकऱ्यांसह आपल्या बोरी ते देऊळगाव मार्गावर असलेल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतापासून अगदी २० मीटर अंतरावर असलेल्या जंगलात वाघरे हे खाकऱ्या तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेतली.
या घटनेची माहिती मिळताच वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्यासह सहायक वनसंरक्षक धनंजय वायभासे, पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, क्षेत्र सहाय्यक उईके आणि अन्य वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
सहा महिन्यांत आठ बळी
वडसा (देसाईगंज) वनविभागाच्या क्षेत्रात यावर्षीच्या सहा महिन्यांत आठ जणांचा वाघहल्ल्यात बळी गेला आहे. त्यात आरमोरी तालुक्यातील चारजण आहेत. सध्या शेतीची कामे जोमाने सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. आरमोरी तालुक्यातील शेतकरी तर हादरून गेले आहेत.