हत्तीने शेतकऱ्याला आपटून चिरडले; गडचिरोली तालुक्यातील घटना  

By गेापाल लाजुरकर | Published: October 18, 2023 10:31 AM2023-10-18T10:31:41+5:302023-10-18T10:32:17+5:30

कळपाला जंगलात वळवणे बेतले जीवावर

Farmer killed in wild elephant attack in Gadchiroli Taluka | हत्तीने शेतकऱ्याला आपटून चिरडले; गडचिरोली तालुक्यातील घटना  

हत्तीने शेतकऱ्याला आपटून चिरडले; गडचिरोली तालुक्यातील घटना  

गडचिरोली : शेतात आलेल्या रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याला रानटी हत्तीने सोंडेने उचलून खाली आपटले. त्यानंतर त्याला तुडवून ठार केले. ही घटना मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील दिभना शेतशिवारात घडली. 

होमाजी गुरनुले (५५) रा. दिभना असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दिभनापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात रानटी हत्ती आल्याची माहिती दिभना गावात मिळाली. त्यानुसार होमाजी गुरनुले हे अन्य एका शेतकऱ्यासोबत आपल्या शेतात रात्री ८ वाजताच्या सुमारास पीक संरक्षणार्थ व कळपाला जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी गेले होते. रानटी हत्तींना शेतातून जंगलाच्या दिशेने वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु शेतात सर्वत्र हत्ती पसरले होते. 

दरम्यान, कळपातीलच एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी एका झाडाचा आडोसा घेतला; परंतु हत्तीने होमाजी यांना सोंडेने उचलून जागी आपटले. त्यानंतर तुडविले यात होमाजी गुरनुले हे जागीच ठार झाले तर सोबतचा शेतकरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला. 

वनविभागाविरोधात रोष

या भागात आठ दिवसांपासून रानटी हत्ती ठाण मांडून आहेत. पण, वन विभागाने योग्य ती सतर्कता बाळगली नाही. शेतकरीच हत्तींना जंगलाच्या दिशेने पांगविण्यासाठी गेले होते. रात्री ९:३० वाजता घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामाची कार्यवाही झाली. वनविभागाचे अधिकारी-कार्यकर्ते उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.

Web Title: Farmer killed in wild elephant attack in Gadchiroli Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.