शेतकरी व पशुधन वन्यप्राण्यांच्या दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 05:00 AM2021-08-21T05:00:00+5:302021-08-21T05:00:45+5:30
घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशूधन आणि शेतकरी जंगली ...
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशूधन आणि शेतकरी जंगली प्राण्यांच्या दहशतीत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात वन्यप्राण्यांच्या ४२ घटना नागभीड वनपरिक्षेत्रातच घडल्या आहेत. तळोधी वनपरिक्षेत्राची आकडेवारी वेगळीच आहे.
नागभीड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यापैकी १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील जंगलक्षेत्र लक्षात घेऊन काही वर्षापूर्वी तळोधी ( बाळापूर) येथे स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील गोविंदपूर, कचेपार, गिरगाव, सोनापूर, वाढोणा, गंगासागर हेटी,जनकापूर, बाळापूर, देवपायली,बोंड, मिंडाळा, कोसंबी गवळी, मिंडाळा, नवेगाव हुंडेश्वरी,मौशी, ढोरपा, बालापूर खूर्द, पाहार्णी, म्हसली,कोरंबी,डोंगरगाव, नवखळा आदी परिसर तर चांगलाच जंगलव्याप्त आहे.
या जंगल परिसरात अनेकदा लोकांना वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचे दावसाढवळ्या दर्शन झाले आहे. अनेकांच्या शेती या जंगलाला लागून आहेत. या गावांचा आणि शेतकऱ्यांचा रोजच जंगलाशी संबंध येतो. त्यामुळे वन्यप्राणी शेतकरी आणि पशुधनावर हल्ले करीत आहेत.
आतापर्यंत असे झाले हल्ले
नागभीड वनपरिक्षेत्रात एप्रिल महिन्यापासून १४ व्यक्तींवर रानटी डुकरांनी हल्ले केले आहेत. दोन व्यक्तींवर बिबट्यांनी तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २६ जनावरे जखमी व मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती आहे. या घटना केवळ घटनाच नाही तर या घटनांचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधन मृत्यूमुखी पडत असल्याने किंवा जखमी होत असल्याने त्या शेतकऱ्याचा त्याचा जो रोजचा व्यवहार आहे तो थांबत असतो.
तळोधी वनपरिक्षेत्र संवेदनशील
नागभीड वनपरिक्षेत्राच्या तुलनेत तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील आहे. गेल्या चार महिन्यात या वनपरिक्षेत्रात वाघाने थेट व्यक्तींवर हल्ला करून ठार केल्याच्या चार घटना आहेत. यात कोजबी माल येथील सरपणासाठी गेलेला व्यक्ती, मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेली महिला आणि आकापूर व वाढोणा येथील दोन गुराख्यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रातही अन्य वन्य प्राण्यांकडून पशूधनावर, व्यक्तींवर हल्ला करून ठार किंवा जखमी केल्याच्या अनेक घटना आहेत.मात्र या घटनांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.