शेतकरी बोनसच्या रकमेपासून वंचित
By admin | Published: April 12, 2017 01:09 AM2017-04-12T01:09:11+5:302017-04-12T01:09:11+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या ...
शेतकरी अडचणीत : आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभार
देसाईगंज : आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रूपये बोनस देण्याचे महामंडळाने जाहीर केले. ३१ मार्च २०१७ पूर्वी धानाची विक्री करूनही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. देसाईगंज, कुरखेडा, कोरची, आरमोरी तालुक्यातील धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी, फेब्रवारी महिन्यात सहकारी संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री केली मात्र अद्यापही त्या शेतकऱ्यांना धानावर मिळणारी बोनसची रक्कम प्राप्त झाली नाही. आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत धान विक्री केल्यास खाजगी धान खरेदीदारांपेक्षा जादाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत असते. मात्र धानाची विक्री रक्कम मिळण्यास उशीर होत असला तरी जादाची रक्कम बोनसच्या स्वरूपात मिळणार या उद्देशाने शेतकरी वर्ग या आधारभूत धानविक्री केंद्रावर धान विकत असतात.
शेतकऱ्यांना याचा फायदा मिळावा यासाठी शासनाने महामंडळा अंतर्गत प्रती क्विंटल २०० रूपये शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी म्हणून बोनस जाहीर केल; मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.
पिकांसाठी बँकेतून मिळणाऱ्या पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करायचा असतो. या कालावधीत कर्जाची परतफेड न केल्यास पुढील वर्षी कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी येतात. शेतीच्या भरवशावर जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची हक्काची रक्कम मिळत नसेल तर त्यानी कर्जाची परतफेड कशी करावी, असा आर्त सवाल शेतकरी करीत आहेत. पगारदार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. मात्र त्याच राज्यात शेतकऱ्यांना जाहीर केलेली बोनस रक्कम मिळण्यास अडचणी येत आहेत. (वार्ताहर)