कलिंगडाच्या शेतीकडे वळतोय शेतकरी
By admin | Published: November 9, 2014 11:20 PM2014-11-09T23:20:41+5:302014-11-09T23:20:41+5:30
धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक
गडचिरोली : धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक हेक्टरवर कलिंगडाची लागवड केली जाणार असल्याची शक्यता कृषी विभागाच्याय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूल, तुर, हरभरा, मम्मा, ज्वारी, गहू, लाखोळी, तीळ, करडई, भूईमूंग, मोहरी आदी प्रमुख पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र या पिकांपासून पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला लाभ मिळत नाही. कधीकधी तोट्याचाही सामना करावा लागतो. दरवर्षीच्या या कटकटीला त्रासून जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळत चालला आहे. बाजारपेठेत कलिंगडाला चार महिने मागणी राहते व चांगला भाव मिळत असल्याने दरवर्षी कलिंगडाच्या शेतीचे प्रमाण वाढतच चालले आहे. मागील वर्षी सुमारे ७०० हेक्टरवर कलिंगडाची शेती करण्यात आली होती. यावर्षी १ हजार पेक्षा अधिक हेक्टरवर कलिंगडाची शेती केली जाणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कलिंगडाची लागवड सध्या सुरू झाली असून दीड महिन्यात हे पीक हातात येणार आहे. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ९० टक्के राहत असल्याने उन्हाळ्यात या फळाची प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. ज्या शेतीला उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाठिकाणी हे पीक घेतले जाते. पूर्वी या पिकाची लागवड काही विशिष्ट शेतकरीच करीत होते. त्यांच्याकडून अनुभव घेतल्यानंतर स्वत:च शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करणे सुरू केले आहे. काही शेतकरी दुसऱ्याला कसण्यासाठी देत आहेत. यातून सदर शेतकऱ्यालाही अधिकचा पैसा मिळत आहे. कलिंगडाची लागवड उन्हाळभर चालत असल्याने यातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे स्थलांतरीत होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. विशेष म्हणजे कलिंगडाच्या लागवडीसाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांमधील उत्साह वाढीस लागला आहे. (नगर प्रतिनिधी)