मृगातही ऊन्हाच्या झळा बळीराजाला करीत आहेत असह्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:27 AM2019-06-10T10:27:33+5:302019-06-10T10:28:10+5:30
यावर्षी उष्णतामानाने कहर केला असून उन्हामुळे जीवाची लाही -लाही होत आहे. शेतीच्या खरीपपूर्व हंगामाला काही प्रमाणात सुरवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: यावर्षी उष्णतामानाने कहर केला असून उन्हामुळे जीवाची लाही -लाही होत आहे. शेतीच्या खरीपपूर्व हंगामाला काही प्रमाणात सुरवात झाली आहे. जनावरांच्या सुक्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. वाढलेल्या तापमानाने मात्र शेतीची मशागत करतांना बळीराजाच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. रोहणी नक्षत्रात हुलकावणी देणारा पाऊस मृगातही उन्हाच्या झळांनी बळीराजाला असह्य करीत आहे. त्यामुळे बळीराजासह नागरिकही मान्सून पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
८ जून ला मृगनक्षत्रास सुरवात झाली. रोहिणी नक्षत्राच्या शेवट पावसाची काही ठिकाणी हलकी सर आली. परंतू ती वातावरणात गारवा निर्माण करण्यास अपयशी ठरली. मागील दोन तीन वर्षापासून मृगही हुलकावणी देत असल्याने वातावरणात उकाडा कायम आहे. उन्हाळ्यापेक्षाही जास्त ऊन मृगात लागत आहे. १७ जून नंतर मान्सून बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असला तरी उन्हाच्या तीव्रतेने कासावीस झाला आहे.
मृगनक्षत्रास प्रारंभ झाला असल्याने शेतकरी बि- बियाण्यांचा शोध घेत आहेत.बाजारात अनेक कंपन्यांचे बियाणे आले असले तरी मात्र असून शेतकऱ्यांकडून बियाने खरेदीला मात्र वेग आलेला नाही. योग्य बियाणे कंपनीचे व कोणत्या वाणांचे बियाणे घेणे फायदेशीर राहील याची शेतकऱ्यांमध्ये चाचपणी सुरु आहे. शेती नांगरी न झाल्याने वाफे तयार करण्यास प्रारंभ होण्यास आहे. तूर लागवडीसाठी धुरे सफाईला सुरूवात झाली असली तरी माती टाकण्यास मात्र पाऊसाची प्रतिक्षा आहे.
कृषि विभागामार्फत शेतीपूर्व हंगामात कोणती कामे करावी, बियाणे खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. एकंदरीत खरीपपूर्व शेती हंगामाच्या तयारीस बळीराजा लागला असला तरी मृग नक्षत्र लागून तीन दिवस झाले तरी पाऊस येण्याचे चिन्हे नसल्याने तो हवालदील झाला आहे.