शेतकऱ्यांच्या बारदान्याचे पैसे मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:14+5:302021-03-10T04:36:14+5:30
शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विकला जावा म्हणून ३५ रुपयांचा बारदाना वापरून आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर २० रुपयांत ...
शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विकला जावा म्हणून ३५ रुपयांचा बारदाना वापरून आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर २० रुपयांत बारदाना दिला होता; पण वर्ष उलटून देखील २० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाहीत.
चालू खरीप हंगामात देखील आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केंद्रावर अल्प प्रमाणात बारदाना पुरवण्यात आला. २० मार्चपर्यंत खरीप हंगामातील धान खरेदी करण्याची शेवटची तारीख असली तरी अजूनही अनेक केंद्रांवर मोठ्या प्रमाणात धान उघड्यावर पडून असून, धान्य उचल करण्याचा परवाना तयार करण्यात आला नाही. याबाबत आरमोरी उपप्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला; पण अजूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. धान उचल करण्याचा परवाना तत्काळ बनवण्यात यावा, अशी मागणी संस्थांच्या व्यवस्थापकाने वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात केली आहे.