शेततळ्यांचा पशूंना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:41 PM2019-04-28T23:41:01+5:302019-04-28T23:42:35+5:30
रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निर्माण करण्यात आलेले शेततळे व वनतलाव पाळीव व रानटी जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदून दिले जाते. या शेततळ्यांचा उपयोग शेतकरी पावसाळ्यात अंतिम टप्प्यात पीक असताना विशेषत: करतात. कारण या कालावधीत पावसाने दगा दिला असतो. पिकाच्या अंतिम टप्प्यात हे तलाव उपयुक्त ठरतात. याशिवाय उन्हाळ्यात पाळीव जनावरांसाठी या शेततळ्यांचा उपयोग होतो. याशिवाय जलयुक्त शिवार योजनेतून जंगलालगत अथवा गावाच्या बाहेर निर्माण करण्यात आलेल्या वनतलावातील पाणी जनावरांसाठी उपयोगी ठरतो. अशा प्रकारचे अनेक शेततळे व वनतलाव सध्या उपयुक्त ठरत आहेत. गावागावांतील अनेक विहिरी व हातपंपाने तळ गाठला असताना जिल्ह्यातील अनेक शेततळे व वनतलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक असल्याने जनावरांचा त्याचा उपयोग होत आहे.
पंधरवड्यात पडणार कोरडे
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विहिरी व हातपंप कोरडे पडत आहेत. अशा स्थितीतही शेततळे व वनतलावातील थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु हा पाणीसाठा जास्तीत जास्त पंधरा दिवसांपर्यंत राहू शकतो. पंधरवड्यानंतर वनतलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे.