भेंडाळा परिसरातील शेतकरी अजूनही वीज मीटरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:25 AM2021-06-24T04:25:17+5:302021-06-24T04:25:17+5:30
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकरी श्रीरंग मशाखेत्री यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून सबसिडी अंतर्गत आपल्या शेतात वीज जोडणीसाठी गेल्या दोन ...
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकरी श्रीरंग मशाखेत्री यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून सबसिडी अंतर्गत आपल्या शेतात वीज जोडणीसाठी गेल्या दोन वर्षापूर्वी जून २०१८ मध्ये महावितरण कार्यालय भेंडाळा येथे डिमांड भरले होते पण अजूनपर्यंत सदर शेतकऱ्याला वीज मीटर मिळालेच नाही. सन २०१६ -२०१७ मध्ये शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत या शेतकऱ्याला नवीन विहीर, बोअरवेल तसेच मोटार पंपची योजना मिळाली होती. आपल्या शेतातीत पीक वाचविण्याकरिता ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली असतानासुद्धा सदर शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळत नसल्याने कर्जबाजारी झालेला शेतकरी आता हतबल झाला आहे. वीज जोडणीसाठी सदर शेतकरी जेव्हा वारंवार महावितरण कार्यालय भेंडाळा येथे जात असते तेव्हा तेव्हा वीज कर्मचारी सांगतात की, अजूनपर्यंत शेतामधील वीज जोडणीचा टेंडर निघाला नाही. जेव्हा निघेल तेव्हा तुमच्या शेतात वीज मीटर लाऊन दिला जाईल. असे सदर कार्यालयातील कर्मचारी सांगत असतात. जर दोन वर्षांपूर्वी सदर शेतकऱ्याच्या शेतात विजेची जोडणी झाली असती तर हा शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला तसेच इतर पीक घेऊन आपला आर्थिक स्त्रोत वाढविला असता. पण महावितरण कंपनीच्या विलंबाच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
डोळ्यांसमोर असलेल्या वस्तूचा आपण गेल्या दोन वर्षांपासून काहीही उपयोग करत नाहीत याची खंत मात्र या शेतकऱ्याला होतं आहे. वीज जोडणी द्यायची नव्हतीच तर धडक सिंचन योजने अंतर्गत शासनाने विहीर, बोअरवेल, मोटरपंप मला कशाला दिले असा गंभीर प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या शेतात वीज मीटर लाऊन द्यावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात लोकमत प्रतिनिधीने महावितरण कार्यालय भेंडाळा येथील अभियंता सोबत भ्रमणध्वनीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.