प्रतिबंधित बिटी बियाणे खरेदी करणारे शेतकरीही कृषी विभागाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 04:09 PM2024-05-11T16:09:39+5:302024-05-11T16:10:25+5:30

प्रशासन सावध : विक्रेत्यांवर लक्ष, तेलंगणातून अहेरी मार्गे होते जिल्ह्यात आवक

Farmers buying banned Bt seeds also on Agriculture Department's radar | प्रतिबंधित बिटी बियाणे खरेदी करणारे शेतकरीही कृषी विभागाच्या रडारवर

Farmers buying banned BT seeds also on Agriculture Department's radar

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
शासनाने काही कापसाच्या बियाण्यांवर प्रतिबंध घातला आहे. अशा बियाण्यांची खरेदी तेलंगणा राज्यातून केली जाते. तेलंगणा राज्यातील काही विक्रेते थेट या बियाण्यांची विक्री शेतकऱ्यांना करतात. या बियाण्यांची खरेदी केल्याचे आढळून आल्यास संबंधित विक्रेता व खरेदीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील बाजारात बोगस बियाणे खासगी व्यक्तीमार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही मान्यता नाही. अशा प्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. यात एचटीबीटी आढळून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर एचटीबीटी लागवड केल्याने जमिनाचा हास होऊन जमिनी कालांतराने नापीक होतात. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे या बियाण्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष, बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करते वेळेस शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारींचे निवारण होईल.

 

या क्रमांकावर संपर्क साधा
नियंत्रण कक्षात तक्रारीकरिता ९४०४५३५४८१, ०७१३२- २२२५९३, ०७१३२-२२२३१२ तसेच टोल फ्री क्र. १८००२३३४०० या क्रमांकावरसुद्धा संपर्क करता येईल.
• बोगस खते बियाणे विक्री होत असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

 

ही काळजी घ्या
●  बोगस बियाणे, खते, कीटकनाशके, ॐ लिकिंग, ज्यादा दराने विक्री, पक्की बिलाची पावती न दिल्यास त्याची तक्रार करावी. निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानाचे नाव, लॉट नंबर, खरेदीदाराचे नाव, विक्रीची किंमत, अंतिम मुदत असल्याची खात्री करूनच घ्यावी.

●  पावतीवर शेतकऱ्याची सही व अंगठा २ तसेच विक्रेत्याची सही व शिक्का असावा. कच्चे बिल स्वीकारू नये. पक्क्या बिलाचा आग्रह करावा. हंगाम संपेपर्यंत बिल जपून ठेवावे, पेरणीसाठी पिशवी फोडताना खालील बाजूने फोडावी, व पिशवीला असलेले टॅग व लेबल जपून ठेवावा.

●  फेरीवाले विक्रेते यांच्याकडून बी-बियाणे, खते व कीटकनाशक यांची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी केले आहे.

 

Web Title: Farmers buying banned Bt seeds also on Agriculture Department's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.