शेतकरी कन्येची भरारी, एमपीएससीतून मंत्रालयीन सहायक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:24 PM2023-08-18T13:24:59+5:302023-08-18T13:25:32+5:30

तीन किलोमीटर पायपीट : शिकवणी न लावता अतिदुर्गम बिड्री गावच्या लेकीचे यश

Farmer's daughter Bharari, Ministerial Assistant from MPSC | शेतकरी कन्येची भरारी, एमपीएससीतून मंत्रालयीन सहायक

शेतकरी कन्येची भरारी, एमपीएससीतून मंत्रालयीन सहायक

googlenewsNext

रवी रामगुंडेवार

एटापल्ली (गडचिरोली) : जेमतेम ७० उंबरे अन् साडेतीनशे ते चारशे लाेकसंख्येच्या अतिदुर्गम बिड्री गावच्या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीशिवाय राज्य लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) गड सर करत कर व मंत्रालयीन सहायक या पदाला गवसणी घातली. रोज तीन किलोमीटर पायपीट करत, अपुऱ्या सुविधा असताना प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून लेकीने मिळवलेल्या यशाचे अख्ख्या गावाला कौतुक आहे.

एटापल्ली तालुक्याची अजूनही अतिसंवेदशील नक्षलग्रस्त व मागास अशी ओळख आहे. तालुक्यात शैक्षणिक विशेष सुविधा नसतानाही बिड्री गावातील अश्विनी अशोक दोनारकर या युवतीची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन कर व मंत्रालयीन सहायक पदी वर्णी लागली आहे. अंतिम कौशल चाचणीत राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात द्वितीय क्रमांक मिळवून तिने यश काबीज केले.

२०२१ मध्ये कोरोनाकाळात तिने परीक्षेसाठी अर्ज केला होता. ऑगस्ट २०२२ मध्ये परीक्षा झाली. ११ मुलींच्या राखीव पदाकरिता १०७ मुलींनी परीक्षा दिली. यात संगणकासह इंग्रजी कौशल्यात तिने ११९ गुण मिळवत यशावर आपले नाव कोरले. तिचे वडील सामान्य शेतकरी, तर आई गृहिणी आहे. तिच्या यशाने ते भारावून गेले आहेत. कुठलीही शिकवणी न लावता पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने अश्विनी दोनारकरचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

वसतिगृहात राहून शिक्षण

अश्विनी दोनारकर हिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या येमली येथील विवेकानंद हायस्कूलमधून पूर्ण केले. यासाठी तिला रोज पायपीट करावी लागे. पुढे महाविद्यालयीन शिक्षण तसेच बीएस्सी, बीएड हे पदवीचे शिक्षण तिने गडचिरोलीत शासकीय वसतिगृहात राहून पूर्ण केले.

आई-वडिलांसह अश्विनीचे शाळेकडून कौतुक

विवेकानंद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येमली येथे अश्विनी दोनारकर हिचा आई- वडिलांसह सत्कार झाला. यावेळी संचालक मिलिंद बागे, सरपंच ललिता मडावी, माजी सरपंच रामा तुमरेटी, प्रा. नितीवंत डोंगरे, आर. बी. उइके, शाळा व्यवस्थापन समितीचे बाजीराम हिचामी, शंकर सडमेक व गावकरी उपस्थित होते. या सत्काराने अश्विनी भारावून गेली. तिने आपल्या संघर्षाचा पट उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

परिस्थिती कशीही असो, पण शासकीय नोकरी मिळवायची ही जिद्द सुरुवातीपासूनच होती. शिक्षक, आई- वडील, बहिणीचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे हे यश शक्य झाले. दुर्गम भागातील मुलांनी परिस्थितीमुळे माघार घेऊ नये तर परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण घेऊन प्रगती साधावी.

- अश्विनी दोनारकर

Web Title: Farmer's daughter Bharari, Ministerial Assistant from MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.