शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:31 PM2019-07-23T22:31:55+5:302019-07-23T22:32:27+5:30

विद्यमान सरकारच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘मागेल त्याला बोडी’ या दोन योजना अंमलात आणण्यात आल्या. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शेततळे व बोडीचे काम पूर्ण केले.

Farmers deprived of grants | शेतकरी अनुदानापासून वंचित

शेतकरी अनुदानापासून वंचित

Next
ठळक मुद्देदीड हजारांवर लाभार्थी अडचणीत : शेततळ्याचे काम पूर्ण करूनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यमान सरकारच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘मागेल त्याला बोडी’ या दोन योजना अंमलात आणण्यात आल्या. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शेततळे व बोडीचे काम पूर्ण केले. काम पूर्ण होऊनही तब्बल दीड हजारांवर शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.
टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकारच्या वतीने जलसंधारणाची अनेक कामे विविध योजनेतून हाती घेण्यात आली. या योजनांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्यापही अनुदान न मिळाल्याने दीड हजारवर शेतकऱ्यांच्या शासकीय कार्यालयात येरझारा सुरूच आहेत. ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यभरात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दीड हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला देण्यात आले. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून ११ हजार ५०५ अर्ज आॅनलाईन स्वरूपात प्राप्त झाले. यापैकी ११ हजार ३२३ शेतकरी लाभार्थ्यांनी सेवा शुल्क अदा केले. त्यानंतर निकषानुसार १० हजार ९२४ लाभार्थी योजनेसाठी पात्र झाले. यापैकी ८ हजार १४३ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. आतापर्यंत जिल्हाभरात ५ हजार २६२ इतक्या शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी ३ हजार १७ शेतकऱ्यांना अनुदानापोटी १५४२.१५ लाख रुपये वितरित करण्यात आले. शेततळ्याचे काम पूर्ण होऊनही दीड हजारवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात शेततळे व बोडीचे मिळून एकूण ५ हजार ५७३ कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६४६, धानोरा १०४०, चामोर्शी १०६९, मुलचेरा ६४०, देसाईगंज ५३, आरमोरी ७२७, कुरखेडा २५०, कोरची ४७०, अहेरी २१३, एटापल्ली २७९, भामरागड १६१, सिरोंचा तालुक्यात २५ कामे पूर्ण करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच शेतीच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. सरकारच्या वतीने या योजनांची जनजागृती केली जाते. मात्र निधीचे नियोजन, योग्य व्यवस्थापन नसल्याने तसेच यंत्रणेच्या उदासीनेमुळे कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ही स्थिती गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारी स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक आहे.
३२ लाखांच्या निधीतून जिल्ह्यात ३११ बोड्यांची निर्मिती
मागेल त्याला शेततळे या योजनेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भरघोष प्रतिसाद मिळत असून शेततळ्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांकडून बोडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर ११ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार शेततळ्याऐवजी शेतकऱ्यांना बोडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. सदर योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ४४० बोडी निर्माण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले. ३१ मार्च २०१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात बोडी निर्मितीसाठी २ हजार ३४ अर्ज आॅनलाईन स्वरूपात प्राप्त झाले. यापैकी १ हजार ३४४ लाभार्थ्यांनी सेवा शुल्क भरले. त्यानंतर १ हजार ५२ लाभार्थी शेतकऱ्यांना निकषानुसार योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले. बोडींच्या ५०६ कामांना कार्यारंभ आदेश दिले. त्यानंतर ३११ कामे पूर्ण झाली. १०० बोड्या निर्मितीवर लाभार्थ्यांना अनुदान वाटपापोटी ३२ लाख २२ हजार रुपयांचा खर्च झाला.

Web Title: Farmers deprived of grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.