अ‍ॅपल बोर कलमात शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Published: August 2, 2015 01:28 AM2015-08-02T01:28:49+5:302015-08-02T01:28:49+5:30

गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने

Farmers fraud in Apple bore collection | अ‍ॅपल बोर कलमात शेतकऱ्यांची फसवणूक

अ‍ॅपल बोर कलमात शेतकऱ्यांची फसवणूक

Next

आत्मांतर्गत कार्यक्रम : सहा महिन्यानंतर एकही फळ आले नाही
गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने २०१० पासून विविध उपक्रम कृषी विभाग चालवित आहे. याच उपक्रमांतर्गत सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात असलेल्या आत्मा या कृषी विभागाच्या कार्यालयाने जिल्ह्यात सहा हजार कलमांचे वाटप हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना केले. बाराही तालुक्यात या कलमांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत अ‍ॅपल बोरचे उत्पन्न सुरू होईल, अशी माहिती आत्माच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कलमा वितरित करताना दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अ‍ॅपल बोरच्या कलमांची लागवड आपल्या शेतात केली. अ‍ॅपल बोरच्या कलमा पश्चिम महाराष्ट्रातील पुरवठादाराकडून मागविण्यात आल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. आत्माचे प्रकल्प संचालक हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या हितसंबंधातून हा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. कलमा लावून त्याची योग्य पध्दतीने निगा राखल्यानंतरही सहा महिने उलटल्यावर बहुतांश झाडाला बोर लागलेच नाही.
त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आत्माच्या कार्यालयाकडे या बाबतची मौखिक तक्रार केली. आता प्रकल्प संचालकांनी हात वर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याची जमीन चुनखडीचे प्रमाण अधिक असलेली आहे. त्यामुळे कदाचित बोराचे उत्पादन आले नसावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आत्माचे संचालक हे कृषितज्ज्ञ असतात. त्यांना जमिनीचा अभ्यास असतोच. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीचा पूर्व अभ्यास न करता केवळ सरकारी अनुदान खर्च करण्यासाठी त्यांनी अ‍ॅपल बोरचा हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांची फसवणूक केली व सरकारी निधीचा अपव्यय केला, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी या कलमा घेतल्या त्यांनाही कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळालेले नाही. त्यांचीही फार मोठी फसवणूक आत्माच्या अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे या कलमांचा पुरवठादार व गडचिरोली येथील आत्माचे प्रकल्प संचालक यांच्यावर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कोणताही अधिकारी येऊन शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतीच्या नावावर नानाविध उपक्रम सांगत असतो व शेतकरी नागविला जातो, अशी तीव्र भावना शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)
कमी कालावधीत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारे झाड म्हणून अ‍ॅपल बोरचे वितरण मागील वर्षी करण्यात आले. या अ‍ॅपल बोरला वर्ष उलटूनही फळे लागली नाही. याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे केली आहे. सदर शेतकऱ्यांच्या शेतात चुनखडीचे प्रमाण असावे, त्यामुळे झाडाला फळे लागली नाही. काही झाडांना फळे येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी.
- अनंत पोटे, प्रकल्प संचालक,
आत्मा गडचिरोली

Web Title: Farmers fraud in Apple bore collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.