तेलंगणाकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Published: March 18, 2017 02:16 AM2017-03-18T02:16:42+5:302017-03-18T02:16:42+5:30
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर होऊ घातलेल्या मेडिगड्डा धरणासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.
पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्तांचा आरोप : योग्य मोबदल्याशिवाय जमीन न देण्याचा इशारा
अहेरी : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर होऊ घातलेल्या मेडिगड्डा धरणासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. या जमिनीसाठी तेलंगणा सरकार अत्यंत कमी किंमत देऊन फसवणूक करीत आहे. सदर प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे, असा आरोप प्रकल्पग्रस्त वडधम, पोचमपल्ली येथील गावकरी व शेतकऱ्यांनी अहेरी येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.
तेलंगणा सरकार सिरोंचा तालुक्यात अडाणी व अशिक्षीत शेतकऱ्यांचा गैरफायदा उठवत आहे. प्रकल्पात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला म्हणून अत्यंत कवडीमोल भाव दिला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तेलंगणा सरकार स्वत:चेच हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर प्रकल्प आमच्यासाठी व कुटुंबासाठी धोकादायक आहे. जमिनीच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे भाव द्यावा, जमिनीची पर्यायी व्यवस्था करावी व प्रकल्पग्रस्त कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नोकरी दिली तरच आपण जमीन देऊ, अन्यथा जमिनी देणार नाही, या विरोधात मोठे जण आंदोलन उभारले जाईल, असा इशारा वडधम, पोचमपल्ली व परिसरातील शेतकरी व नागरिकांनी दिला आहे. वडिलोपार्जीत व चार पिढ्यांपासून वास्तव्यास असलेले गाव तेलंगणा सरकारच्या मेडिगड्डा प्रकल्पामुळे सोडावे लागणार आहे. कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेलसह सिंचन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. या सिंचन विहिरी बोअरवेल व इतर सुविधांचाही मोबदला देणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबाला पेन्शन लागू करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली. याबाबतचे निवेदन अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे सोपविले. पत्रकार परिषदेला सरपंच चंद्रय्या क्रिष्टय्या सिहानिनी, राजन्ना लसमय्या सल्ला, संजीव राजन्ना गोरे, रवींद्र येरय्या सल्ला, पुरेली लिंगय्या, चल्ला शंकरय्या, बंगारू आकुला व्यंकटेना गोरे, श्रीनिवास राजाराम, सल्ला महेश येरय्या, सल्ला रमेश पोचम, गोरे तिरूपती लिंगय्या, गोरे श्रीनिवास राजाराम, अनुमूला शंकर लिंगय्या, पट्टेम समय्या मलय्या, दासरी राजन्ना चंद्रय्या यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)