गडचिरोलीतील कारली दलालांच्या दावणीला; लॉकडाऊनचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 06:40 PM2020-04-24T18:40:51+5:302020-04-24T18:41:12+5:30
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते. तालुक्याच्या मोहटोला-किन्हाळा परिसरात कारल्यांचे भरपूर प्रमाणात उत्पादन होत आहे. मात्र त्यांना बाहेर माल नेता येत नसल्याने दलालांमार्फत व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे येथील कारले दलालांच्या दावणीलाच बांधले असल्याचे दिसून येत आहे.
मोहटोला-किन्हाळा गाव कारल्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अवघ्या चार-पाच वर्षात या भागात व्यापाऱ्यांनी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली. परिसरातील संपूर्ण कारले सदर बाजारपेठेत येत असल्याने व्यापारी हा माल दूरवरच्या भागात नेऊन विक्री करायचे; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर जिल्ह्यात मालाची वाहतूक करता येत नाही. कारल्यांची विक्री जिल्ह्यांतर्गतच करावी लागत आहे. यासाठी माल खरेदीकरिता व्यापाºयांना गावाच्या वेशीवरच थांबावे लागत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार मोहटोला-किन्हाळा ग्रामपंचायतने ठराव घेऊन गावातील कारले बाजारावर लक्ष ठेवत बाजारपेठ बंद पाडली. येथील बाजारपेठ बंद पडल्याने कारले खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला ठिय्या गावाच्या वेशीवर मांडला. ते कारल्यांची खरेदी करीत आहेत. त्यांनी कारल्यांची खरेदी सुरुच ठेवली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील वस्तंूच्या नावावर खरेदी केलेले कारले कुठे जातात, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.
ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवर कर्मचारी नेमून गावात येणाºया वाहनाची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. येथे प्रवेश करणाऱ्यांचे वाहन क्रमांक, परवाना क्रमांक, चालकाचे नाव, सोबत येणारे खरेदीदार व दलालांचे नाव खरेदीदार दलालांचे नाव, माल विक्रीला नेण्याचे ठिकाण आदी माहितीची नोंद घेत आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुण्यासाठी पाणी व साबन वापरणे आवश्यक केले आहे. सध्या हे खरेदीदार वेशीवरच थांबून मालाची खरेदी करीत आहेत. मात्र याठिकाणी मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.