शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:00+5:302021-05-28T04:27:00+5:30
देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी ...
देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
अल्पवयीनांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडले असून भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई होत नसल्याने अल्पवयीन वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटीला फटका
अहेरी : जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी या दोन आगारांमार्फत राज्य परिवहन महामंडळाची बससेवा संपूर्ण जिल्ह्यात चालविली जाते. गडचिरोली आगाराच्या १०५ व अहेरी आगाराच्या ६५ बसगाड्या दुर्गम भागात धावतात. मार्गावरील खड्ड्यांमुळे एसटीचे नुकसान होत आहे.
पं. स. परिसरातील प्रसाधनगृहाची दुरवस्था
आरमाेरी : स्थानिक पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या प्रसाधनगृहात घाण साचली आहे. भिंतीलाही विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, स्वच्छतेकडे पं. स. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीत ग्रामीण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त येतात. प्रसाधनगृह स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
वनजमिनीवर अतिक्रमण; जंगल धोक्यात
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वनविभागात अनेक नागरिकांनी वनजमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.
जननी शिशू सुरक्षा योजनेची जागृती करा
गडचिरोली : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या जननी शिशू सुरक्षा योजनेचा अनेक ठिकाणी फज्जा उडाला आहे. अनेक महिला शासनाच्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. आरोग्य विभागामार्फत या योजनेची प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने योजना मर्यादित आहे.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
काेरची : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने या योजना राबविताना अडचणी निर्माण होत आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
रांगी : परिसरात प्रत्येक गावी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या प्रवासी निवाऱ्यांकडे एस.टी. विभाग व शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही निवारे मोडकळीस आले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर थांबून बसची वाट बघत असल्याचे चित्र बघावयास मिळते.
आश्रमशाळेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, अहेरी, भामरागड प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत.
रस्त्याकडेच्या वाहनांमुळे अपघाताचा धाेका
गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रस्त्यालगतच्या वाहनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांमुळे वादळ-वारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, आरोग्य धोक्यात आले आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब लावण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.
हेमाडपंथी शिवमंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, असे सांगितले जाते.
विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर
आष्टी : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविना
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने हे साहित्य धूळ खात पडून आहेत. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीजपुरवठा आवश्यक झाला आहे.
वाहनतळ नसल्याने नागरिकांना त्रास
देसाईगंज : शहरात खासगी रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्यावर वाहने उभी ठेवली जात असल्याने वाहतुकीची काेंडी हाेण्याचे प्रकार वाढत आहेत.
ग्राहकांची लूट थांबवावी
आरमाेरी : लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे ग्राहकांची लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी ग्रामीण, तसेच शहरी भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे. बनावट बिल ग्राहकांच्या माथी मारले जात आहे.
सेवायोजन कार्यालय कुचकामी
गडचिरोली : पूर्वी येथील सेवायोजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते. मात्र, ऑनलाईन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगार नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाहीत.
उपकेंद्रांना स्वतंत्र इमारतीची गरज
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
आलापल्ली : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. बऱ्याचदा संपर्क हाेताे. मात्र, आवाज येत नाही.
ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीज चोरी केली जात आहे.
डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
दूध शीतकरण केंद्र सुरू करा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अर्धवट पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ कि.मी. अंतर कापून धानोरा व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार
भामरागड : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात दोन हजारपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे. बहुतांश कर्मचारी सुगम भागात ठिय्या मांडून बसून राहतात.