मेडिगड्डा बॅरेजचे काम शेतकऱ्यांनी रोखले
By admin | Published: March 31, 2017 01:10 AM2017-03-31T01:10:07+5:302017-03-31T01:10:07+5:30
गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामासाठी वाहतूक करता यावी म्हणून
तहसीलदारांना निवेदन : शेतातून रस्ता तयार केल्याने कंत्राटदारावर कारवाई करा
सिरोंचा : गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामासाठी वाहतूक करता यावी म्हणून अवैधरीत्या शासनाची परवानगी नसताना शेतकऱ्यांच्या शेतातून रोड तयार करण्यात आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद करून संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोचमपल्ली, वडधम येथील शेतकऱ्यांनी निवेदनातून सिरोंचा तहसीलदारांकडे केली आहे.
पोचमपल्ली व वडधम येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, आमची शेतजमीन गोदावरी नदीच्या काठावर असून तेलंगणा शासनाकडून सिंचनासाठी मेडिगड्डा बॅरेजचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाकरिता साहित्य ने-आण करण्यासाठी आमच्या शेतातून अवैधरित्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्ता तयार करण्यासाठी माती, मुरूम आणून जेसीबीच्या सहाय्याने आमची परवानगी न घेताच कंत्राटदाराने रस्ता तयार केला आहे. त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. सदर मेडिगड्डा बॅरेजकरिता ४०० एकर जमीन संपादन करणे तेलंगणा सरकारला आवश्यक आहे. परंतु पोचमपल्ली येथील ४३.३६५ हेक्टर आर जमिनीची आवश्यकता असल्याचे सांगून वडधम, आयपेठा येथील शेतकऱ्यांना बैठकीला न बोलविता पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांना बोलावून बैठक आटोपण्यात आली. जमिनीचा मोबदला आजच्या बाजारभावाप्रमाणे देण्याची व अन्य अटी तेलंगणा सरकारने धुडकावून लावल्या आहे, असे या शेतकऱ्यांनी या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत मोबदल्याबाबत तेलंगणा सरकारकडून व महाराष्ट्र शासनाकडून अंतिम निर्णय होत नाही. तोपर्यंत संबंधित रस्ता काम त्वरीत बंद करून या कामासाठी वापरण्यात येत असलेली पोकलँड व जेसीबी, ट्रॅक्टर व ट्रक आदी जप्त करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)