शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायावर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:31+5:302021-06-09T04:45:31+5:30
धानोरा तालुका हा जंगल व्याप्त असून, मोठ्या प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता आहे. तालुक्यात जनावरांची संख्या सुद्धा अधिक आहे. परंतु या ...
धानोरा तालुका हा जंगल व्याप्त असून, मोठ्या प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता आहे. तालुक्यात जनावरांची संख्या सुद्धा अधिक आहे. परंतु या जनावरांपासून दुग्ध उत्पादन खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घट होते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनावर भर द्यावा. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक दूध दिनाचे औचित्य साधून तालुका लघु पशुचिकित्सालय धानोरा व तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यावर एंझाईन प्रक्रिया मिक्सर व किटचे वितरण करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. संजय धोटे, पशुविकास अधिकारी फिरते पथक डॉ. एस. सी. लोहकरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. एकनाथ उसेंडी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेभुर्णे यांच्यासह तालुक्यातील दुग्ध उत्पादक लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.