सिंचन विहिरींचे अनुदान रखडल्याने शिवणीतील शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:26 AM2018-01-06T00:26:01+5:302018-01-06T00:26:13+5:30
मागेल त्याला सिंचन विहीर या धडक सिंचन विहीर कार्यक्रमातून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत शिवणी बूज येथील शेतकऱ्यांना विहीर मंजूर झाली. लाभार्थी नारायण पत्रे, गुरूदेव पत्रे, पंढरी राऊत, पंकज सपाटे........
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : मागेल त्याला सिंचन विहीर या धडक सिंचन विहीर कार्यक्रमातून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत शिवणी बूज येथील शेतकऱ्यांना विहीर मंजूर झाली. लाभार्थी नारायण पत्रे, गुरूदेव पत्रे, पंढरी राऊत, पंकज सपाटे, ज्ञानेश्वर मातेरे, तेजराव बोरकर, श्यामराव पत्रे व विठोबा भर्रे आदी आठ लाभार्थ्यांनी सन २०१६-१७ या वर्षात सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. मात्र अद्यापही बोअरवेलचे देयक प्रलंबित आहे. त्यामुळे सदर लाभार्थी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मागेल त्याला सिंचन विहीर योजनेंतर्गत बोअरवेल व सिंचन विहिरीचे संपूर्ण अनुदान अदा करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आरमोरीचे संवर्ग विकास अधिकारी कोमलवार यांना निवेदन दिले.
शिवणी बूज गावातील पाणी पातळी ३५ ते ४० फुट खोल आहे. त्यानंतर रेती लागत असल्याने बोअर मारायला जमत नाही. योजनेच्या नियमानुसार ४० ते ५० फुट पेक्षा विहिरीची खोली अधिक झाली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीपेक्षा यासाठी अधिकचा खर्च आला आहे.
शिवणी बूज परिसरात पाणी पातळी चांगली असल्याने लवकरच विहिरीला पाणी लागले. त्यामुळे येथे बोअर मारण्याची मुळीच गरज नाही. त्यामुळे या शेतकºयांनी विहीर अधिक खोल खोदली. असे असतानाही आता सदर विहिरीमध्ये बोअर मारण्याची सक्ती प्रशासनाकडून केली जात असून बोअर न मारल्यास बोअरचे अनुदान कपात करण्याचा इशारा प्रशासनाने या शेतकºयांना दिला आहे. त्यामुळे शिवणी बूज येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या समस्येला घेऊन त्यांनी बीडीओंची भेट घेतली.