भाजीपाला पिकावरील किडीमुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:32+5:302021-03-08T04:34:32+5:30
वैरागड : वैरागड भागासह आरमोरी तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या वर्षी रबी हंगामात भाजीपाला ...
वैरागड : वैरागड भागासह आरमोरी तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या वर्षी रबी हंगामात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, भाजीपाला पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
आरमोरी तालुक्यातील कोसरी, मांगदा, कुलकुली, तुलतुली आदी भागात गेल्या चार ते पाच वर्षांपासून भाजीपाला पिकाची लागवड केली जात आहे. यामध्ये वांगी, कांदे, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेऊन आपल्या शेतात छोट्या-मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या साहाय्याने पाणीपुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागातून टमाटर, वांगी व इतर भाजीपाला व पालेभाज्यांची आवक आरमोरी व गडचिरोलीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने रब्बी हंगामात भाजीपाला पिकाची शेती करीत आहेत. मात्र, कीड व राेगांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.