दुष्काळ निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच
By admin | Published: May 3, 2017 01:35 AM2017-05-03T01:35:40+5:302017-05-03T01:35:40+5:30
२०१४-१५ या वर्षात अत्यंत कमी पाऊस झाल्याने कुरखेडा व कुंभीटोला या गावात प्रशासनाने सर्वे करून सदर गावे दुष्काळग्रस्त म्हणून ....
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कुरखेडा व कुंभीटोलातील शेतकरी वंचित
कुरखेडा : २०१४-१५ या वर्षात अत्यंत कमी पाऊस झाल्याने कुरखेडा व कुंभीटोला या गावात प्रशासनाने सर्वे करून सदर गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केली होती. मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली नाही. आर्थिक मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे.
कुरखेडा तालुका धान पिकावर अवलंबून आहे. रोजगाराचे इतर साधने उपलब्ध नसल्याने संसाराचा संपूर्ण गाडा धानपिकातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर चालतो. २०१४-१५ या वर्षात प्रशासनाने सर्वे केला. त्यावेळी कुरखेडा व कुंभीटोला येथील शेतकऱ्यांचे पीक पावसाअभावी करपले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही दोन्ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली.
काही दिवसानंतर दुष्काळनिधीची ५० टक्के रक्क्म त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र या बाबीला एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी अजूनही मदत मिळाली नाही. मतद तत्काळ द्यावी, अशी मागणी न. पं. सभापती आशा तुलावी, पं. स. सदस्य संध्या नैताम, मनोज सिडाम, नरेश नाकाडे, मनोहर उईके, बालकदास भानारकर, राजीराम देशमुख, गोपाळा चंदनखेडे, भास्कर देशमुख, विस्तारी भानारकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)