शेततळ्याचे काम अयोग्य
By Admin | Published: April 17, 2017 01:40 AM2017-04-17T01:40:40+5:302017-04-17T01:40:40+5:30
वैरागड ग्राम पंचायतीअंतर्गत येणाऱ्या पाठणवाडा येथील शेतकरी केशव कुमरे व नरसू कुमरे यांच्या शेतात शेततळा खोदण्याचे काम सुरू झाले आहे.
पाठणवाडातील प्रकार : जेसीबीच्या साहाय्याने खोदकामाची माती टाकली अस्ताव्यस्त
वैरागड : वैरागड ग्राम पंचायतीअंतर्गत येणाऱ्या पाठणवाडा येथील शेतकरी केशव कुमरे व नरसू कुमरे यांच्या शेतात शेततळा खोदण्याचे काम सुरू झाले आहे. सदर काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे.
भूजल पातळीत वाढ व्हावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान हातात घेतले आहे. याअंतर्गत पाठणवाडा येथील केशव कुमरे व नरसू कुमरे या दोन शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करण्यात आले आहे. दोन्ही शेततळ्याचे काम यंत्राच्या सहाय्याने केले जात आहे. शेततळ्यात जास्तीत जास्त पाणी साचून राहण्यासाठी शेततळ्याची पाळ उंच असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेततळ्यामधून निघलेली माती व्यवस्थित पाळीप्रमाणे पसरविणे आवश्यक आहे. शेततळ्यांचे खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने केले जात आहे. खोदकामादरम्यान निघालेली माती व्यवस्थित न टाकता अस्ताव्यस्त फेकून देण्यात आली आहे. त्यामुळे शेततळ्यात पाणी साचून राहण्यास अडचण निर्माण होणार आहे. सदर माती व्यवस्थित करतो म्हटल्यास शेतकऱ्याला हजारो रूपयांचा खर्च येणार आहे. गरीब शेतकऱ्यांना एवढा खर्च झेपणे अशक्य आहे. खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराला कृषी सेवकाचे अभय असल्याचे दिसून येत आहे. शेततळ्यासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे, याची माहिती कृषी सेवक शेतकऱ्यांना देण्यास तयार नाही. यावरून कंत्रादार व कृषी सेवक यांची मिलीभगत असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
दोन्ही शेततळ्याचे काम जेसीबीसीच्या सहाय्याने करण्यात आले. खोदकाम रात्रीच्या वेळी झाल्याने शेततळ्याची पार समांतर झाली नाही. मात्र शेतकऱ्यांना सदर काम पुन्हा योग्य पध्दतीने करून दिल्या जाईल. सदर शेततळा कामासाठी मंजूर झालेल्या ५० हजार रूपयांचा निधी यंत्राने काम करणाऱ्या लोकांना वितरित करण्यात आला.
- डी. टी. आंबीलडुने, कृषी सहायक, वैरागड