रेल्वे पुलातून जीवघेणी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:07 AM2018-11-15T01:07:52+5:302018-11-15T01:09:43+5:30
देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून शहरांच्या दोन्ही बाजूला आवागमन करण्यासाठी रेल्वेने भूयारी पुलाची निर्मिती केलेली आहे. परंतु येथून अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक केली जात आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डांबर मिश्रीत गिट्टी चुरीने भरलेला ट्रक या भुयारी मार्गावरुन नेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून शहरांच्या दोन्ही बाजूला आवागमन करण्यासाठी रेल्वेने भूयारी पुलाची निर्मिती केलेली आहे. परंतु येथून अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक केली जात आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डांबर मिश्रीत गिट्टी चुरीने भरलेला ट्रक या भुयारी मार्गावरुन नेण्यात आला. संपूर्ण ट्रकमध्ये गिट्टी भरली असतानाच केबिनच्यावर मजुरांना बसवून जीवघेणा प्रवास करण्यात आला.
देसाईगंज येथील रेल्वेभुयारी मार्गाच्या सुरुवातीलाच ओव्हर हेड ब्रेकर लावलेले आहेत. या ब्रेकरची उंची जमिनीच्या ब्रेकरपासून साडेतीन मीटर उंचीवर आहे. बुधवारी डांबरमिश्रीत बारीक गिट्टी भरलेला ट्रक या ठिकाणावरुन जात असताना वर बसलेल्या मजुरांना पूर्णपणे कॅबीनमध्ये झोपावे लागले. अनावधानाने जर चालकाची जराशी चूक झाली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता. विशेष म्हणजे, भूयारी पुलाची निर्मिती अवजड वाहनांच्या आवागमनासाठी झालेली नसून पादचारी, दुचाकी, चारचाकी व लहान गाड्यांसाठी आहे. परंतु येथून अवजड वाहने सर्रास चालविली जात आहेत. परिणामी इतरही वाहतूक प्रभावित होत आहे. काही तांत्रिक कारणाने वाहन मागे आल्यास मोठा अनर्थही घडू शकतो.
यापूर्वी अवजड वाहन टाकण्यात आल्याने एक-दोन ठिकाणी या मार्गाची तोडफोड झाली आहे. अवजड वाहने जाण्यासाठी बायपास मार्गाची सोय असूनसुद्धा अवजड वाहन चालक शॉर्टकटच्या नादात दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकण्यास मागेपुढे पाहत नाही. संबंधित विभागाने या भुयारी पुलाखालून कोणती वाहने जाणार याचा स्पष्ट निर्देश असलेले सुचना फलक फाटकाच्या दोन्ही बाजूला लावावे.
या सूचनांचे पालन न करणाºया वाहनावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.