गडचिरोलीतील वैरागड किल्ल्याचे भाग्य उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:06 PM2018-04-19T12:06:21+5:302018-04-19T12:06:28+5:30
१५ व्या शतकापासून उन, वारा, पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागडच्या किल्ल्याच्या वास्तूच्या दुरूस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे.
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १५ व्या शतकापासून उन, वारा, पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागडच्या किल्ल्याच्या वास्तूच्या दुरूस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे.
१५ व्या शतकात चंद्रपूरचा गोंडराजा बल्हाळशहाने वैरागडचा किल्ला बांधला. पूर्वी वैरागडला हिऱ्याची खाण होती. हिऱ्याच्या खाणीच्या संरक्षणार्थ राजा बल्हाळशहाने हा किल्ला बांधला. हिऱ्याच्या खाणीची लूट करण्यासाठी मुस्लीम राज्याच्या स्वाऱ्या होत असत. पुढे हिऱ्याच्या खाणीचे काम बंद पडले आणि पुढे बल्हाळशहाने आपल्या उत्तरार्ध सैन्य काढून घेतले. तेव्हापासून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. पुरातत्त्व विभागाकडून येथील भंडारेश्वर मंदिराचे बऱ्याचपैकी सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तेव्हापासूनच किल्ल्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले पण कामाला अपेक्षित वेग नव्हता.
मागील ३-४ वर्षात किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम चालू आहे. बुरूज तर अद्यापही आहे त्याच अवस्थेत आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्त्व विभागाकडून प्राप्त होणारा निधी तोकडा आहे, असे कंत्राटदार शिंदे सांगतात. कामाचा आवाका मोठा असताना सौंदर्यीकरणाच्या कामावर असणाऱ्या मजुरांची संख्या कमी असून या शिल्पकलेत पारंगत असलेल्या कुशल कामगारांचा अभाव आहे. त्यामुळे किल्ल्याच्या दुरूस्तीच्या कामाला विलंब होत आहे.
गोरजाई मंदिराचा विकास करा
वैरागडच्या पूर्वेला नागवंशीय आदीम माना जमातीचा धर्मशील, पराक्रमी राजा कुरूम प्रहोद आणि वैरागड येथील गोरजाईचे मंदिर बांधले. सध्या हे मंदिर भग्नावस्थेत आहे. माना समाज बांधवांचे कूलदैवत असलेल्या या मंदिराची पुरातत्त्व विभागाने दुरूस्ती करावी, अनेक दिवसांपासून मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने समाजामध्ये नाराजी आहे.