हाेळीच्या दिवशी बाप-लेकीवर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 09:59 PM2023-03-08T21:59:09+5:302023-03-08T21:59:38+5:30

Gadchiroli News होळीच्या दिवशी झालेल्या अपघातात बाप लेक जागीच ठार झाल्याची घटना आरमोरी येथे घडली.

Father and daughter died on the spot in Gadchiroli | हाेळीच्या दिवशी बाप-लेकीवर काळाची झडप

हाेळीच्या दिवशी बाप-लेकीवर काळाची झडप

googlenewsNext
ठळक मुद्देम्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारची झाडाला धडक

गडचिरोली: आठ दिवसांपासून एकीमेकींपासून दूर असलेल्या आई आणि मुलीची अवघ्या पाच-दहा मिनिटात भेट होणार होती. दोघीही एकमेकांच्या भेटीसाठी आतुर झाल्या होत्या. परंतु ही भेट नियतीला मान्य नव्हती. आणि आई-मुलीची भेट होण्याआधीच आईपासून मुलीला आणि साेबतच पतीलाही नियतीने हिरावून नेल्याची दुःखद घटना सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

सर्वत्र होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना सोमवारी झालेल्या कार अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाल्याने आरमोरीकरांचे मन हळहळले. आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीला होळीनिमित्त तिच्या आईच्या भेटीसाठी आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनातून आरमोरीकडे येणाऱ्या एका शिक्षकाचे वाहन वडसा-आरमोरी मार्गावरील कालीमाता मंदिराजवळ रस्त्यावर बसून असलेल्या म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नात झाडाला धडकले. या भीषण अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव रमेश मोतीराम ताराम (वय ३५ रा. कलकसा, ता. देवरी, जिल्हा गोंदिया) व त्यांची मुलगी रावी रमेश ताराम (वय अडीच वर्षं) असे आहे. या घटनेने समाजमन हेलावले.

अपघातात ठार झालेले रमेश ताराम हे देवरी तालुक्यातील इस्तारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. शिवाय आई-वडिलांना ते एकुलते एक असल्याने त्यांचा आधारवड होते. रमेश ताराम यांची पत्नी सुनंदा कुमरे या आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. या शिक्षक दाम्पत्याला रावी ही अडीच वर्षांची मुलगी होती. ती आपल्या आईकडे आरमोरी येथे राहत होती. परंतु, आठ दिवसांपूर्वी रमेश ताराम यांनी मुलगी रावीला आरमोरीवरून आपल्या कलकसा गावाला नेले होते. होळीनिमित्त आरमोरीला यायचे असल्याने गावाजवळील एडमागोंदी येथील वाहनचालक योगेंद्र गौतम राऊत (वय २२) व मित्र धनु चमरू चौधरी (वय ३४) यांना घेऊन ते चारचाकी वाहनाने (क्र. एमएच ३३ एसी १६०८) सोमवारी सायंकाळी कलकसावरुन चिचगड, कोरची, कुरखेडा, वडसामार्गे आरमोरीकडे येत होते. चिमुकल्या रावीलासुद्धा आईला कधी भेटतो असे वाटत होते. तिला आपल्या आईची ओढ लागली होती. तर इकडे आई चिमुकल्या रावीची आतुरतेने वाट बघत होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. काळ आपला पाठलाग करीत असल्याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. आरमोरीजवळील कालीमाता मंदिराजवळ म्हशीच्या रूपाने काळाने त्यांना गाठले आणि एका झटक्यात बाप-लेकी हिरावून नेले.

रस्त्यावर बसलेल्या म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनांवरील नियंत्रण सुटले व कार झाडाला धडकून रस्त्याच्या कडेला उलटली. यात शिक्षक रमेश ताराम हे जागीच ठार झाले. तर मुलगी रावी गंभीर जखमी झाली. तिला आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासठी आणण्यात आले. मात्र तिने रुग्णालयात आणल्याबरोबर प्राण सोडले. वाहनचालक योगेंद्र राऊत व धनु चौधरी हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आरमोरीवरून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते.

बाप-लेकीचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पोहोचताच नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ऐन होळी सणाच्या दिवशी सगळे जण होळी पेटविण्यात मग्न असताना अपघात झाल्याने आरमोरीत हळहळ व दुःख व्यक्त केले जात हाेते. कलकसा तेथे सायंकाळी चार वाजता हजारो लोकांच्या उपस्थितीत बाप-लेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकाच म्हशीमुळे चार अपघात

आरमोरीजवळील वडसा मार्गावरील कालीमाता मंदिराजवळ एक म्हैस रस्त्यावर बसलेली होती. रात्रीची वेळ, मार्गाचे डांबरीकरण काळे व म्हैसही काळी असल्याने सुरुवातीला एका दुचाकीस्वाराने म्हशीला धडक दिली. त्यानंतर रमेश ताराम यांचे वाहन म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात झाडाला धडकले. तिसऱ्या अपघातात दुसऱ्या चारचाकी वाहनाने म्हशीला धडक दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. पुन्हा एका दुचाकीस्वाराने त्याच म्हशीला धडक दिली. यात म्हैससुद्धा मरण पावली.

Web Title: Father and daughter died on the spot in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.