ऐश्वर्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; पित्यानेच केले पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 01:38 PM2022-07-11T13:38:16+5:302022-07-11T13:48:29+5:30
देसाईगंज शहरातील हनुमान वाॅर्डातील रहिवासी असलेला संदीप रेखलाल पटले हा ऐश्वर्याचा मृतदेह आढळताच फरार झाला होता.
पुरूषाेत्तम भागडकर
देसाईगंज (गडचिरोली) : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील ऐश्वर्या दिगंबर खाेब्रागडे हिची ब्रह्मपुरी तालुक्यातील हरदोली गावाजवळ हत्या करण्यात आली. या प्रकरणात मुख्य आराेपी असलेला व ऐश्वर्याचा प्रियकर संदीप रेखलाल पटले (२५) याला त्याच्या वडिलांनीच पाेलिसांच्या स्वाधीन केले.
देसाईगंज शहरातील हनुमान वाॅर्डातील रहिवासी असलेला संदीप रेखलाल पटले हा ऐश्वर्याचा मृतदेह आढळताच फरार झाला होता. ९ जुलैच्या रात्री १०.३० वाजता संदीप राहत्या घरी आला. संदीपच्या वडिलांनी ही माहिती ब्रह्मपुरी पाेलिसांना दिली. पाेलिसांनी सापळा रचून रात्री ११.१५ संदीपला वैनगंगा पुलाजवळ अटक केली. संदीपला अटक करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष भुवन लिल्हारे यांनीसुद्धा पाेलिसांना मदत केली.
मित्रानेच केला घात; वर्षभरापासून बेपत्ता तरुणीचा सांगाडाच सापडला
विशेष म्हणजे, ऐश्वर्याच्या वडिलांनी ऐश्वर्या गायब असल्याची तक्रार दिल्यानंतर ब्रह्मपुरी पाेलिसांनी संदीपला चाैकशीसाठी बाेलाविले हाेते. मात्र संदीपने पाेलिसांना चांगलाच गुंगारा दिला. या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे नाटक पाेलिसांसमाेर केले. यात ताे सुरुवातीला यशस्वी झाला.
शिक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली झाली हाेती अटक
या अगोदर संदीपच्या विराेधात चोरीच्या प्रकरणात गोंदिया येथे गुन्हा दाखल झाला हाेता. तेथूनच त्याची गुन्हेगारी जगतात एन्ट्री झाली. तीन वर्षांपूर्वी देसाईगंज येथील शेजारीच राहणारे परशुरामकर या शिक्षकाला संदीपने संपविले हाेते. त्यावेळीही ताे मी नव्हेच अशा अविर्भावात तो वावरत होता. मात्र, श्वान पथकाने यशस्वी कामगिरी करत त्याला ३०२ च्या आरोपाखाली अटक केली. काही दिवस तुरुंगवास भाेगल्यानंतर ताे जामिनावर बाहेर आला होता. वडिलांचा असलेला वेल्डिंग वर्कशाप सांभाळत हाेता. पण मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यसनांच्या आहारी गेला हाेता. आता पुन्हा ऐश्वर्याची हत्या केली.
ऐश्वर्याच्या वडिलांना पक्षघाताचा झटका
मृतक ऐश्वर्याचे वडील खोब्रागडे हे पेशाने डाॅक्टर आहेत. त्यांची पत्नी वेडसर आहे. ऐश्वर्या ही माेठी मुलगी. लहान मुलगी बारावीत आहे. मुलगी दहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली. ती कुठे गेली याचा पत्ताच लागला नाही. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले व त्यांना पक्षाघाताचा झटका आला. ते दवाखान्यात उपचार घेत आहेत.