वडील बांधकामावर राबले, आईने धुणीभांडी केली, लेक झाला वैज्ञानिक
By संजय तिपाले | Published: July 11, 2023 10:47 AM2023-07-11T10:47:22+5:302023-07-11T10:53:44+5:30
एका जिद्दीचा प्रवास: वाढदिवशीच आनंदवार्ता, अणुऊर्जा महामंडळात निवड
संजय तिपाले
गडचिरोली : शहरातील विवेकानंदनगरातील अरुणा व सुखदेव जिलेपल्लीवार हे अल्पशिक्षित जोडपे. अरुणा या धुणीभांडी, तर सुखदेव हे बांधकामावर बिगारी काम करतात. परिस्थितीशी दोन हात करत, त्यांनी दोन्ही मुलांना शिकविले. धाकटे पुत्र सौरभ यांनी मोठ्या जिद्दीने भारतीय अणुऊर्जा महामंडळात वैज्ञानिक अधिकारी या वर्ग १ पदाला गवसणी घातली. फाटक्या गणवेशात शाळेची पायरी चढलेल्या, झोपडीत राहून शिक्षण घेणाऱ्या सौरभ यांचा हा आचंबित करणारा प्रवास.
जिलेपल्लीवार कुटुंबीय मूळचे फराडा (ता.चामोर्शी) येथील. २४ वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात गडचिरोलीत आलेल्या अरुणा व सुखदेव यांच्या संसारवेलीवर दोन छान गोंडस फुले उमललेली. राहायला हक्काचे छत नव्हते की कमाईचे शाश्वत साधन. एका पत्र्याच्या घरात त्यांनी संसार थाटला. सुखदेव हे बांधकाम मजूर म्हणून राबले, तर अरुणा यांनी धुणीभांडी केली. तुटपुंज्या मिळकतीवर संसाराचा गाडा चालवित, त्यांनी सिद्धार्थ (वय २७) व सौरभ (वय २५) यांना शिकविले.
सिद्धार्थ हे बीएसस्सी पदवीधर असून (एमपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करत आहेत. सौरभ यांनी चेन्नईतून एम.टेक पदवी संपादन केलेली आहे. सौरभ यांचे प्राथमिक शिक्षण चामोर्शी रोडवरील मातृभूमी शाळेत, तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये झाले. अकरावी व बारावीला ते शिवाजी विज्ञान महाविद्यालयात होते. दहावी व बारावीतही त्यांनी ८५ टक्के गुण घेऊन विशेष प्रावीण्य मिळविले. त्यानंतर, शासकीय कोट्यातून त्यांना सातारा जिल्ह्यातील कराड येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तेथे त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर गेट परीक्षा देऊन त्यांनी एम.टेक केले. सौरभ यांची एमपीएससी परीक्षेत २०२० मध्ये १० तर २०२१ मध्ये एका गुणाने संधी हुकली होती. मात्र, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.
...अन् डोळ्यात तरळले आनंदाश्रू
भारतीय अणुऊर्जा महामंडळात (एनपीसीआयएल ) निवड झाल्याचे कळाल्यावर सौरभ यांनी घरी फोन केला. स्वर जड व डोळ्यात अश्रू होते, शब्द सुचत नव्हते. अखेर आई, मी क्लास वन ऑफिसर झालो, असे त्यांनी सांगितले. यावेळी आई-वडिलांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले.
खासगी कंपनीत रुजू होतानाच निकाल जाहीर
८ जूनला भारतीय अणुऊर्जा महामंडळात वैज्ञानिक अधिकारी पदासाठी त्यांची थेट मुलाखत झाली होती. याचा निकाल बाकी होता. या दरम्यान सौरभ यांची गुजरातमध्ये एका खासगी कंपनीत निवड झाली. तेथे रुजू होण्यासाठी ते गेले होते. याच वेळी ७ जुलै रोजी अणुऊर्जा महामंडळाने निकाल जाहीर केला, यात वैज्ञानिक अधिकारी म्हणून सौरभ यांची निवड झाली. विशेष म्हणजे, वाढदिवशीच त्यांना ही आनंदवार्ता कळली. त्यानंतर, खासगी कंपनीत रुजू न होता, ते घरी परतले.
आई-वडिलांनी मोठ्या मेहनतीने शिकविले, त्यांच्यामुळेच मी हे यश संपादन करु शकलो. आता त्यांना कष्टाची कामे करु देणार नाही.
- सौरभ जिलेपल्लीवार