वडिलांची टीका आशीर्वाद म्हणून घेईल, तुम्ही शेर तर मी तुमची लेक शेरणी !
By संजय तिपाले | Published: September 12, 2024 04:08 PM2024-09-12T16:08:51+5:302024-09-12T16:15:06+5:30
भाग्यश्री आत्राम भावूक : राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश, मोठे शक्तिप्रदर्शन
गडचिरोली : जनतेचे प्रश्न विचारले तर माझ्यावरच आरोप केले, मला मतदासंघांत फिरवले अन् ऐनवेळी स्वतः लढण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या टीकेने खूप दुःख झाले, पण त्यांची टीका आशीर्वाद म्हणून घेईल... असे भावोद्गार काढून तुम्ही शेर तर मी तुमची लेक शेरणी आहे आणि शेरणी अधिक आक्रमक असते असा इशारा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) शिवस्वराज्य यात्रा १२ सप्टेंबरला अहेरीत दाखल झाली. यावेळी झालेल्या मेळाव्यात भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी पक्ष प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील भुसारा,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी महिला आघाडी विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर , माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट आदी उपस्थित होते. आई स्व.स्नेहादेवी तसेच वडील व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना चरणस्पर्श करते, असा उल्लेख करून भाग्यश्री आत्राम भावूक झाल्या. हुंदका आवरत त्यांनी कथित बंडावर तपशीलवार खुलासे केले.
त्या म्हणाल्या, मंत्री साहेबांना फुरसत नाही. आम्ही कार्यकर्ते जोडून ठेवले. लोकांच्या सुख, दुःखात मी गेले. इथल्या बेरोजगार युवकांना रोजगार द्यायचा होता तर सुरजागडमध्ये का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. वडलापेठमध्ये सुरजागड इस्पात हा नवा प्रकल्प सुरू करत आहेत, पण त्याचे संचालक कोण आहेत, त्यांच्यावर चिटफंड घोटाळ्याचे आरोप आहेत ते संचालक कसे, असा प्रश्नही त्यांनी केला. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, पण कोणाला हात लावला तर गाठ माझ्याशी, असा इशाराही त्यांनी दिला. मैदान जवळच आहे. मीच चौका मारणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, महेबुब शेख, सुनील गव्हाणे, अतुल गण्यारपवार आदींची भाषणे झाली.
शरद पवारांनी घर फोडले नाही , मीच तीनवेळा भेटले
शरद पवार यांनी घर फोडल्याच्या मंत्री धर्मरावबाबांच्या आरोपाला भाग्यश्री आत्राम यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, त्यांनी घर फोडले नाही, मी स्वतःच त्यांना तीनवेळा भेटले. धर्मरावबाबा आत्राम यांचे १९९० मध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. तेंव्हा शरद पवार यांनी प्रयत्न करून सुटका केली होती. हे उपकार कधी विसरता येणार नाहीत.. आता मी त्यांच्या पक्षात काम करून हे ऋण फेडणार आहे , असे त्या म्हणाल्या.