वडिलांची प्रकृती बिघडली अन् नर्सिंग कॉलेजची हर्षदा दुग्ध व्यवसायात उतरली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:05 PM2022-12-19T18:05:44+5:302022-12-19T18:09:28+5:30

प्रतिकूल परिस्थितीत बनली कुटुंबाची ढाल

Father's health worsened and Harshada of nursing college became the shield of the family by entering her father's dairy business | वडिलांची प्रकृती बिघडली अन् नर्सिंग कॉलेजची हर्षदा दुग्ध व्यवसायात उतरली

वडिलांची प्रकृती बिघडली अन् नर्सिंग कॉलेजची हर्षदा दुग्ध व्यवसायात उतरली

googlenewsNext

भीमराव मेश्राम

जोगीसाखरा (गडचिरोली) : पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेणाऱ्या सावित्रीच्या लेकींनी आता -प्रत्येक क्षेत्रात पाय रोवले. चूल- मूल व पुरुषांची मर्जी सांभाळण्याची भारतीय इतिहासातील परंपरा आता पुसली जात आहे. महिला विविध क्षेत्रात अग्रणी बनल्या आहेत. याचेच एक उदाहरण जोगीसाखरा येथे पाहायला मिळते. वडिलाची प्रकृती बिघडल्याने नर्सिंगचे शिक्षण घेणारी हर्षदा तुळशीराम मेश्राम ही गेल्या आठ दिवसांपासून दुग्ध व्यवसायात उतरली. 

तुळशीराम मेश्राम हे गेल्या सहा-सात वर्षांपासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून म्हशी पाळून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. याच व्यवसायाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. आई आशावर्कर, एक भाऊ, दोन बहिणी असे गरीब कुटुंब. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थामुळे बंद पडलेल्या दुग्ध व्यवसायात हात घातला. प्रतिकूल परिस्थितीत हर्षदाने वडिलांच्या प्रेमापोटी म्हशीच्या दुधाच्या शुभ्र धारांनी भांड्यांचा भरणा करून व्यावसायिकता जोपासली. प्रत्येक व्यवसायावर कर्तबगार महिलांनी आपले नाव कोरले, अशीच कृती हर्षदाने केली. तिच्या या अनोख्या पुढाकाराबद्दल पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.

म्हशीच्या संगोपनाचे काम

हर्षदा ही घरीच अभ्यास करून जनावरांना नियमित चारा, खाद्य, पाणी घालून रोज सकाळी व सायंकाळी पाच म्हशींचे २० ते २५ लिटर दूध काढून ते विक्रीसाठी लहान भावाला आरमोरी शहरात पाठविते. शिक्षणापलीकडे इतर कुठलाही अनुभव नसताना म्हशींच्या कासेलगत बसून दुधाचा भरणा करणे बऱ्याच नवख्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना देखील शक्य नसते. 

व्यवसाय झाला होता बंद; सुट्या घेऊन परतली गावी

आठ दिवसांपूर्वी हर्षदाच्या वडिलांची प्रकृती बिघडली. तुळशीराम यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे म्हशीचे दूध काढून ग्राहकांना नियमित विक्री करणे बंद झाले. रुग्णालयातील खर्चाचा बोजा वाढला. ही वाईट वार्ता ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नर्सिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या हर्षदाला कळली. हर्षदा ही मोठी मुलगी असल्याने तिने सुट्या घेऊन वडिलांच्या हाकेला धावून आली. यापूर्वी कधीही दुग्ध व्यवसायात डोकावून न पाहणाऱ्या मुलीने कुणी काही म्हणतील, याची तमा न बाळगता संकटकाळात ढाल बनून उभी राहिली.

Web Title: Father's health worsened and Harshada of nursing college became the shield of the family by entering her father's dairy business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.