एफडीसीएमच्या जंगलताेडीमुळे वन्यप्राण्यांचा निवारा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 05:22 PM2021-12-13T17:22:28+5:302021-12-13T17:26:34+5:30
नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील अधिक घनतेचे असलेले शिरपूर जंगल वनविभागाने एफडीसीएमला हस्तांतरित केल्यानंतर मागील १०-१२ वर्षांपासून येथे जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे वन्य जीवांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीव रस्त्यावर, मोकळ्या जागेत आश्रय घेत आहेत. यातून अवैधरित्या त्यांची शिकार हाेत आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड, सालमारा, कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावरखेडा वाढाेणा, वडसा तालुक्यातील चिखली (रिठ) येथील जास्त घनतेचे जंगल वनविभागाने एफडीसीएमकडे वर्ग केला. तेव्हापासून या तालुक्यातील जास्त घनतेच्या जंगलांची कत्तल सुरू आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच, शिवाय वन्य जीवांचा निवारा हिरावला जाताे.
शिरपूर, सावरखेडा, वैरागड या जंगलात हरीण, नीलगाय, ससा व अन्य तृणभक्षी, प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. येथे विविध प्रजातींचे पक्षीही हाेते. सध्या ही संख्या राेडावली आहे. वृक्षताेडीमुळे मोकळ्या जागी येणाऱ्या प्राण्यांची शिकार होऊ लागली.
सागवान राेपण अयशस्वी
नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून ऊन, वारा, पाऊस झेलून उभे असलेले वनवैभव नष्ट करून त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.
मागील १० वर्षांत लावलेले सागवान रोपे यशस्वी झाले नाहीत. वनविभागाने वर्ग केलेल्या जास्त घनतेच्या जंगलांची अशीच कत्तल होत राहिल्यास वनांची आणि वन्य जीवांची मोठ्या प्रमाणात हानी हाेऊ शकते. त्यामुळे वनविभागाने जंगल एफडीसीएमकडे वर्ग करू नये, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.