मुंबई, नागपुरातील रुग्णवाढीमुळे पालकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:08+5:302021-09-10T04:44:08+5:30
गडचिराेली : पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या माेठ्या शहरांमध्ये काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या दिवसात आता ...
गडचिराेली : पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या माेठ्या शहरांमध्ये काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या दिवसात आता तालुकास्तरावरही गर्दी हाेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही काेराेनाचा उद्रेक हाेईल काय, या भीतीने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जवळपास ९० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती ८० टक्क्यांच्या जवळपास पाेहाेचली आहे. नियमित वर्ग सुरू असल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकही समाधानी आहेत. गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या मागील दाेन महिन्यापासून जेमतेम २० ते ३० च्या जवळपास आहे. त्यामुळे पालकही आपल्या पाल्यांना शाळेत बिनधास्त पाठवीत हाेते. मात्र मागील आठ दिवसापासून मुंबई, नागपूर यासारख्या माेठ्या शहरांमधील रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील शेकडाे नागरिक दरवर्षी नागपूर येथे जातात. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने पालक चिंतेत सापडले आहेत.
बाॅक्स...
८० टक्के शाळा सुरू
गडचिराेली जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग कमी आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतर शाळा सुरू करण्यास पालक, विद्यार्थी व शिक्षकांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ग्रामीण भागातील सर्वच आठवी ते बारावीपर्यंतचे बहुतांश विद्यार्थी शाळेत येत आहेत. केवळ शहरी भागातील शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत.
काेट...
माेठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे काेराेनाचे संकट आता ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही. सणासुदीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही गर्दी वाढत चालली आहे.
मात्र एकाच वेळी काेराेनाची साथ येणार नाही. त्यामुळे काही दिवस मुलांना शाळेत पाठविण्यास काहीच हरकत नाही.
- शिवराम नंदये, पालक