तीन शालेय विद्यार्थ्यांची तलवारबाजी स्पर्धेत भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:39 AM2018-10-10T01:39:57+5:302018-10-10T01:40:53+5:30
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरच्या वतीने नागपूर येथे आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली येथील प्लॅटिनम हायस्कूलचे दोन व कारमेल हायस्कूलचा एक अशा तीन विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरच्या वतीने नागपूर येथे आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली येथील प्लॅटिनम हायस्कूलचे दोन व कारमेल हायस्कूलचा एक अशा तीन विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत निवड झाली आहे.
प्लॅटिनम हायस्कूलचा विद्यार्थी ओम रंजन टेप्पलवार याने १७ वर्ष वयोगटात विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला. याच शाळेचा विद्यार्थी चैतन्य मासुरकर याने १७ वर्ष वयोगटात विभागीय स्पर्धेत अंतिम फेरी गाठून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले. कारमेल हायस्कूलची विद्यार्थिनी इशा सतीश तुंडूरवार हिने १४ वर्ष वयोगटात सुयश प्राप्त केले. जिल्हा फेनसिंग असोसिएशनचे अध्यक्ष रंजन टेप्पलवार यांचे सदर खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.
यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, मदन टापरे, प्रशिक्षक संदीप उईके, दीपक आईलवार व दोन्ही शाळांच्या प्राचार्यांनी कौतुक केले आहे. विभागीय तलवारबाजी स्पर्धेत यश धुर्वे, प्रशीक किरमिरे, प्रसाद टेप्पलवार, रूचित तेलतुंबडे, चैतन्य वाढणकर, चैतन्य मेहता, अनिल गेडाम, मंथन संतोषवार, संचित मेहता आदी सहभागी झाले होते. यातून टेप्पलवार, मासुरकर व तुंडूरवार यांनी यश मिळविले.