मातृभाषेतूनच भावना व्यक्त होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:37+5:30
याप्रसंगी ग्रंथदिंडीचा शुभारंभ सचिन अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राघवेंद्र मुनघाटे व आर. पी. निकम यांनी खांदा देऊन ग्रंथ दिंडीला मार्गस्थ केले. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली. दरम्यान आयोजित कार्यक्रमात आर. पी. निकम यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या विविध ग्रंथ व नाटकांविषयी माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मनातील भावना व्यक्त करणे व व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी मातृभाषाच कामी येते. मातृभाषेतून भावना व विचार योग्य प्रकारे मांडले जाऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले.
येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन गुरूवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राघवेंद मुनघाटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्राचार्य ज्ञानेश्वर मामीडवार, उपमुख्याध्यापिका उषा गोहणे उपस्थित होत्या.
याप्रसंगी ग्रंथदिंडीचा शुभारंभ सचिन अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राघवेंद्र मुनघाटे व आर. पी. निकम यांनी खांदा देऊन ग्रंथ दिंडीला मार्गस्थ केले. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली. दरम्यान आयोजित कार्यक्रमात आर. पी. निकम यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या विविध ग्रंथ व नाटकांविषयी माहिती दिली. ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाचन उपयोगी पडत असल्याने वाचन हा गुण मुलांनी स्वीकारणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.
शिक्षणाधिकारी प्राथमिक राघवेंद्र मुनघाटे यांनी शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची केल्याने आता मराठी भाषेला ज्ञान भाषा होण्यासाठी चालना मिळेल. इंग्रजीने मराठी भाषेला वेढले आहे. आपण मराठीत इंग्लिशचा वापर करून दोन्ही भाषांना न्याय देत नाही, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात वकृत्त्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मामीडवार तर आभार प्रा. एस. एल. ताजने यांनी मानले.
चर्चासत्रात मांडल्या कल्पना
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा या विषयावर पत्रकारांसाठी चर्चासत्राचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालयातर्फे करण्यात आले. याप्रसंगी मराठी भाषेचा सर्वच स्तरातून वापर करणे गरजेचे आहे. त्यातूनच मराठीला योग्य दर्जा मिळण्यास मदत होईल, असे मत पत्रकारांनी व्यक्त केले. या चर्चासत्रात पत्रकार अनिल धामोडे, हेमंत डोर्लीकर, रेखा वंजारी यांनी भाग घेतला. १० मिनीटे मराठी भाषेतून उत्कृष्ट माहिती व चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्रास्ताविक प्रफुलचंद राठोड, संचालन स्वप्नील उंदीरवाडे यांनी केले.