महिला मृत्यू प्रकरण: वैद्यकीय अधिकारी निलंबित; 'टीएचओं'ना कारणे दाखवा
By संजय तिपाले | Published: December 14, 2023 08:28 PM2023-12-14T20:28:41+5:302023-12-14T20:29:16+5:30
धानोरा तालुक्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत १३ डिसेंबर रोजी जि.प. सीईओ आयुषी सिंह यांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले. कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ डिसेंबरला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर झाले. यात कारवाफा येथील साधना संजय जराते (२३) यांची शस्त्रक्रिया झाली होती. दोन दिवसांनतर अचानक त्यांची तब्येत खालावली. जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर १० डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक चौकशीत हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश जांभुळे यांना जि.प.सीईओ आयुषी सिंह यांनी निलंबित केले. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह पाच आरोग्यकर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. याशिवाय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सखाराम हिचामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जयंत पाटील, छगन शेडमाके यांचे निवेदन
दरम्यान, साधना जराते (२३) यांच्या मृत्यूनंतर आरोग्यव्यवस्थेतील निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांची भेट घेऊन अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तर काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना निवेदन देत या घटनेकडे लक्ष वेधले होते.
कुटुंबास तातडीची नुकसान भरपाई
कुटुंब नियोज शस्त्रक्रियेदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास महिलेच्या कुटुंबास दोन लाखांची नुकसान भरपाई दिली जाते. यानुसार साधना जराते यांच्या कुटुंबास तातडीने ५० हजार रुपयांचे सहाय्य केले असून दोन मुलांच्यानावे उर्वरित दीड लाख रुपये जमा केले जाणार आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले.